29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ अमरावती महसूल विभागात पाच प्रकारच्या कीटकनाशकांच्या विक्री, वितरण, वापरास बंदी – कृषिमंत्री...

अमरावती महसूल विभागात पाच प्रकारच्या कीटकनाशकांच्या विक्री, वितरण, वापरास बंदी – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

0
24

अमरावती,दि.20 : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन अमरावती महसूल विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या कीटकनाशकांची पुढील दोन महिन्यांसाठी विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यात काही कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाली होती. ही कीटकनाशके अतिविषारी असून त्यांचा अनधिकृतपणे संमिश्रणासाठी वापर केल्यामुळे त्यांचा प्रभाव अधिक विषारी होत असल्याचे दिसून आले आहे. या कीटकनाशकांमध्ये प्रोफेनोफोस ४० टक्के अधिक सीपरमेथ्रीन ४० टक्के ईसी, फिप्रोनील ४० टक्के अधिक इमीडॅक्लोप्रीड ४० टक्के डब्युजी, ॲसिफेट ७५ टक्के एससी, डीफेन्थीरोन ५० टक्के डब्लुपी, मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के एसएल आदींचा समावेश आहे. कीटकनाशकामुळे विषबाधा झालेल्या घटनेची दखल घेऊन केंद्र शासनाकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या कालावधीकरिता कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाची विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी सांगितले.
धोकादायक कीटकनाशकांची विक्री, वितरण व वापर यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती, फरिदाबाद यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून कीटकनाशकामुळे विषबाधा झालेल्या शेतकरी व शेतमजूर यांच्यावर उपचार सुरू असल्याचेही कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी सांगितले.