30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार-जिल्हाधिकारी शेखर सिंह

आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार-जिल्हाधिकारी शेखर सिंह

0
29

गडचिरोली, दि. .२१ : : महाराष्ट्रासाठी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. राज्यात २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान पार पडणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये आचारसंहितेच्या अनुषंगाने विविध होर्डिंग, बॅनर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत कोणत्याही प्रकारे विकास कामांच्या प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता दिल्या जाणार नाहीत असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रपरिषदेत सांगितले. सर्व राजकीय पक्षांना आवाहन करण्यात येते की आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणाने पार पाडावे याबाबत कोणाकडूनही आचारसंहितेचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात ७,७४,९४८ मतदार आहेत, ९३५ ठिकाणी मतदान केंद्र आहेत तर ९३० मुख्य मतदान केंद्र आहेत. मुख्य निवडणूक आयोगाकडून लेखी सूचना आल्यानंतर मतदान करण्याच्या वेळा ठरवण्यात येतील असे ते म्हणाले. जिल्ह्यात दिव्यांग मतदार संख्या २२३२ आहे. त्यांच्यासाठी ३१६ व्हीलचेअर घेण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये एनसीसी, एनएसएस, विविध युवक मंडळ यांच्या कडून स्वयंसेवक घेण्यात आलेले आहेत. त्यांचे मार्फत मतदान केंद्रावर दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना मदत दिली जाणार आहे. यावेळेस पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्व मतदान प्रक्रिया ही ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनद्वारे केली जाणार आहे. याबाबत सर्व तपासण्या निवडणूक आयोगाकडून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनवर शंका घेण्याचे काहीच कारण नाही. या बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली असून ३१४ ठिकाणी वेगवेगळ्या मतदान केंद्रावर डेमो स्वरूपात ३७१७ मतांची नोंदणी उदाहरण दाखल करण्यात आलेली आहे. आणि त्याची तपासणी पूर्ण करून लोकांच्यात जनजागृती निर्माण करण्यात आली आहे. पुढील कालावधीत मतदार जनजागृती मोहिम अशाच पध्दतीने राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये ४६५० मतदान कर्मचारी आवश्यक असून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच ९५ मतदान केंद्रांवर वेब कास्टींग कार्यान्वित केले आहे.
जिल्हयातील मतदान अधिकारी कर्मचा-यांचे प्रशिक्षण २६, २७ व २८ सप्टेंबरला नियोजित करण्यात आले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यांमध्ये मागील अनुभव पाहता मतदान कर्मचारी यांनी खूप चांगले काम केलेले आहे. तरीही यावेळेस कोणाकडून चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी झाल्या किंवा अनुपस्थित राहिले तर त्याबाबत कारवाई करण्यात येणार असून एफआयआर नोंदविली जाईल. मतदानसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी कोणी मादक पदार्थं सेवन केल्यास तपासणीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अडचणींचा तसेच दुर्गम भागाचा विचार करता निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दुप्पट भत्ता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाकडे नुकताच प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत मंजूरी येणे बाकी आहे.
जिल्ह्यातील मतदारांना विनंती आहे की मतदान प्रक्रियेमध्ये काही अडचण असल्यास १९५० या टोल फ्री नंबर वरती संपर्क करा. तसेच मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी २४ सप्टेंबर अंतिम तारीख आहे या तारखेपर्यंत जे नाव नोंदवतील त्यांना यावेळेस मतदान करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर नोंद होणाऱ्या मतदारांना या विधानसभेत मात्र मतदान करता येणार नाही. तरी सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी वेळेत आपली नोंदणी किंवा नाव आहे किंवा नाही याची तपासणी करावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ व माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे सदस्य कृष्णा रेड्डी उपस्थित होते.