27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे आवाहन

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे आवाहन

0
32

स्विप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती

 भंडारा दि 26:- विधान सभा निवडणूकीमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरीता तसेच त्यांच्याकरीता उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना व्हावी. या करीता लाखनी तालुक्यातील ग्रामपंचायत पालांदूर, कवलेवाडा, खराशी, मुरमाडी तु., दिघोरी, नान्होरी तसेच अरविंद योग साधना केंद्र लाखनी येथे स्विप कार्यक्रमांतर्गत ईव्हिएम व व्हिव्हिपॅटबाबत जनजागृती करण्यात आली.

साकोली विधानसभा क्षेत्रांतर्गत लाखनी तालुक्यात स्विप कार्यक्रमांतर्गत लोकशाही बळकट करण्यासाठी, नागरिक मतदानापासून वंचित राहू नये याकरीता तहसिलदार म‍लिक विराणी यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत स्तरावर मतदान प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आज 25 सप्टेंबरला ग्रामपंचायत पालांदूर, कवलेवाडा, खराशी, मुरमाडी तु., दिघोरी, नान्होरी तसेच अरविंद योग साधना केंद्र लाखनी आदि ठिकाणी दिव्यांग मतदार तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करण्यासाठी पुढे यावे याकरीता प्रात्यक्षिकाद्वारे मतदान प्रक्रियेचे महत्व पटवून देण्यात आले.

मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांकरीता उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच मतदारांना मतचिठ्ठयांचे वाटप, मतदान करुन घेण्यासाठी मदत देणे, घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत आणणे व पोहचवून देणे, गरजेनुसार मतदानासाठी सहकार्य करणे, स्तनदा मातांना मतदान करण्यासाठी रांगेत जास्त वेळ उभे न करता शक्य तेवढया लवकर मतदान करवून घेणे. दिव्यांग मतदारांनी लवकर मतदान करण्यास  मदत करणे, तसेच ईव्हिएम व व्हिव्हिपॅट बाबत प्रात्यक्षिकाद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया पटवून देण्यात आली.

लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदानाची गरज आहे. आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार अवश्य बजावावा, असे आवाहन स्विप कार्यक्रमाची जनजागृती करतांना  नायब तहसिलदार श्रीमती दोनोडे, नोडल अधिकारी नरेश नवघरे, अश्विनी न्यायमुर्ती, रिना निर्वाण, जे.एम. आखरे, कुमारी डहाट, बावनकर, मेश्राम, ढाबरे, सौ. थोटे, भांडारकर, सुनिल भाग्यवानी, शुभदा धुर्वे यांनी केले.

बेलघाटा वार्डात मतदानाची जागृती

पवनी येथील बेलघाटा वार्डात हनुमान मंदिराच्या सभागृहामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅटच्या जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी  मतदानाच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमात मतदारांतर्फे मतदान करुन प्रक्रिया समजावण्यात आले. पथक प्रमुख व्हि.के. ब्राम्हणकर, तलाठी एम.डी. इप्पर, तलाठी सयाम, तुळसकर यांनी हा जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नागरिकांकडून प्रात्यक्षिकादरम्यान करण्यात आलेल्या मतदानाची खात्री करण्यात आली व अन्य मतदानाची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. यावेळी मतदान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.