30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ सदृढ बालक स्पर्धा, पाककृती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सदृढ बालक स्पर्धा, पाककृती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
43
  • सदृढ बालक स्पर्धेत सम्यक मनवर, पियुष कुटे प्रथम
  • महिलांना मतदार जागृतीची शपथ

वाशिम, दि. २9 : जिल्ह्यात पोषण अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत शुक्रवारी जिल्हास्तरीय सदृढ बालक स्पर्धा व पाककृती स्पर्धेचे नियोजन भवन येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर हे होते.यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, गट विकास अधिकारी निलेश वानखेडे, सामान्य रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. पवार, श्री. खुजे, पोषण अभियान प्रबंधक आंचल घोडेस्वारजिल्हा समन्वयक वाजीद बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. मोहुर्ले यांनी पोषण अभियानाच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, बालकांचे पहिले १०० दिवस अॅनेमियाअतिसारहात धुणे आणि स्वच्छतापौष्टिक आहार या मुद्द्यांविषयी जनजागृती करण्यासाठी १ ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात पोषण अभियान राबविण्यात येत आहे. विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून सुरु असलेल्या या अभियानात विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सदृढ बालक स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय स्पर्धांमधून निवडले गेलेले २२ बालक सहभागी झाले होते. ० ते ३ वर्षे व ३ ते ६ वर्षे अशा दोन गटात ही स्पर्धा झाली. यामध्ये ० ते ३ वर्षे वयोगटात मंगरूळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील सम्यक प्रशांत मनवर याने प्रथम, वाशिम येथील अर्पित ऋषिराज याने द्वितीय व कारंजा तालुक्यातील पलाना येथील विराट सिरसाट याने तृतीय क्रमांक पटकाविला. ३ ते ६ वर्षे वयोगटात मालेगाव येथील पीयूष राम कुटे याने प्रथम, रिसोड तालुक्यातील कळमगव्हाण येथील संस्कार ज्ञानेश्वर मोरे द्वितीय, अनसिंग येथील वेदांत संतोष ठाकरे व वाशिम येथील श्रेयश जगदीश गाभणे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.पाककृती स्पर्धेत २६ महिला सहभागी झाल्या होत्या. यामध्ये काटा येथील सरस्वती दादाराव देशमुख यांच्या पाककृतीची विशेष चौरस आहार म्हणून निवड करण्यात आली. तसेच मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील इंदू आत्माराम निंबोकार यांच्या पाककृतीला प्रथम, कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील वर्षा राजेश खोपे यांच्या पाककृतीला द्वितीय व वाशिम येथील पंचशीलनगर मधील नंदा उद्धव कोठेकर यांच्या पाककृतीला तृतीय क्रमांक देण्यात आला.

यावेळी शाहीर के. के. डाखोरे आणि त्यांच्या कलापथक संचाने पोषण अभियान विषयक गीतांचे सादरीकरण केले. मालेगाव तालुक्यातील पांघरी येथील अंगणवाडी सेविका शोभा नवघरे यांनी ‘किती सांगू मी सांगू कुणाला, आला पोषण महिना आला…’ हे गीत गावून पोषण अभियानचे महत्व सांगितले. सूत्रसंचालन उज्ज्वला मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व तालुका समन्वयक व श्रीमती मीनाक्षी सुळे व इतर पर्यवेक्षिका यांनी परिश्रम घेतले.

लोकशाही सदृढ बनविण्यासाठी करा मतदान !

पोषण अभियान अंतर्गत पाककृती व सदृढ बालक स्पर्धेला सुमारे ३०० महिला, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. यावेळी महिलांना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली. येणाऱ्या २१ ऑक्टोंबर रोजी सर्व महिलांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सदृढ करण्यासाठी आपला सहभाग द्यावा. तसेच कुटुंबातील प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजाविण्याबाबत सांगावे, असे आवाहन यावेळी श्री. मोहुर्ले यांनी केले.