भंडारा,दि.01ः-महिला पोलिस उपनिरीक्षकांच्या विनयभंगाच्या आरोपाखाली कारागृहात असलेले तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांची राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. परिणय फुके व खा. सुनील मेंढे यांनी सोमवारी कारागृहात जाऊन भेट घेतली. या प्रकरणाची नि:पक्ष चौकशीची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करु, असे त्यांनी यावेळी सांगितले.
शनिवारी आ. चरण वाघमारे यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या सर्मथकांनी विविध ठिकाणी निषेध नोंदविला. विशेषत: आ. वाघमारे यांच्या पाठीशी जिल्ह्यातील तेली समाज पुढे आल्याने या प्रकरणाला भाजपविरोधी वळण मिळाले. तेली समाजाच्या प्रतिनिधीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही झाला. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. फुके यांनी आधीच पोलिस अधीक्षकांशी भेट घेऊन संपूर्ण चौकशीअंतीच कारवाईचे निर्देश दिले होते. तर सोमवारी त्यांनी कारागृहात जाऊन आ. वाघमारे यांची भेट घेत विचारपूस केली. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीनंतर आ. वाघमारे हे जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या अटकेनंतर तुमसरातील राजकारण मोठय़ा प्रमाणात प्रभावित झाले आहे. विधानसभेच्या उमेदवारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने आ. वाघमारे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की भाजप दुसरा चेहरा पुढे करेल, हे पाहण्यासारखे राहील.





