आरोग्य विभागाचे कर्मचारी वेतनापासून वंचित

0
14

सुकडी (डाकराम) : प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी (डाकराम) येथील एएनएम, मलेरिया कर्मचारी व इतर कर्मचारी यांचे जानेवारी २०१५ पासून वेतन झाले नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी/डाकराम येथील स्थायी कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व इतर कर्मचारी यांचे जानेवारी २०१५ पासून वेतन झाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी येथील वैद्यकीय अधिकारी यांना वेतन का झाले नाही विचारले असता, त्यांनी वेतन लवकरच होणार असे सांगितले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.आर. टेंभुर्णे यांनी सांगितले की, सेवार्थपुस्तक (आॅनलाईन) असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे सेवार्थ झाले नाही. काही कर्मचाऱ्यांचे सेवार्थ झाले. त्यामुळे वेतन उशिरा होणार. येथील सहायक लिपीक शरणागत यांना कोणतेच कामे जमत नसल्यामुळे कार्यालयातील कामे उशिरा होते व त्यांच्यामुळे वेतन झाले नाही, असे सांगितले.लग्नसराई असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना पैशाची नितांत आवश्यकता आहे. तीन महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे दुकानदारसुद्धा उसणवारीवर सामान देत नाहीत. या सर्व अडचणींमुळे येथील कर्मचाऱ्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास होत आहे.
या त्रासाला येथील वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचे बोलले जाते. ज्या कर्मचाऱ्यांना कामे करता येत नाही, अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे