वाशिम, दि. ०4 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूककरिता जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून प्रकाश बिंदू यांची नियुक्ती केली आहे. ते आज जिल्ह्यात दाखल झाले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्याकडून त्यांनी जिल्ह्यातील निवडणूक विषयक पूर्वतयारीची माहिती घेतली.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांचे संपर्क अधिकारी तथा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवडणूक निरीक्षक (सामान्य) प्रकाश बिंदू हे २००९ च्या तुकडीतील भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. ते सध्या उत्तर प्रदेश राज्याच्या वित्त विभागात विशेष सचिव पदावर कार्यरत असून जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने त्यांची नियुक्ती केली आहे. प्रकाश बिंदू हे वाशिम शासकीय विश्रामगृह येथील गोदावरी कक्षामध्ये दररोज सकाळी १० ते ११ वा. दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतील. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७८२०९०६१७४ आणि ई-मेल [email protected] असा आहे. या भ्रमणध्वनी क्रमांकावर व ई-मेलवर नागरिक निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांच्याशी संपर्क साधू शकतात, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.




