गडचिरोली, दि.10 : कॉमनवेल्थ स्पर्धेत 2014 मध्ये कांस्य पदक विजेते ओंकार ओतारी गडचिरोली जिल्ह्याचे मतदार जनजागृती विषयक आयकॉन म्हणून नेमण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांची तहसिलदार म्हणून 1 महिन्यापुर्वीच अहेरी येथे बदली झाली आहे. मुळचे कोल्हापूर येथील ओंकार ओतारी यांनी वेटलिफ्टींग मध्ये स्कॉटलँड येथे 2014 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत 69 वजनी गटात कांस्य पदक मिळविले होते.आता प्रशासनातील कामाबरोबर त्यांना अजून एक महत्वाची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. जिल्ह्याचे मतदार जनजागृती आयकॉन म्हणून त्यांना काम पाहवे लागणार आहे.
| ओंकार ओतारी हे कुरुंदवाड, कोल्हापूर येथील असून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन वेटलिफ्टींगमध्ये प्राविण्य मिळविले. वयाच्या 12 व्या वर्षीपासून तयार झालेला हा नाद युवकांना प्रेरणा देणारा आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेले ओंकार यांनी अनेक कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यातूनही त्यांनी मार्ग काढत यश संपादन केले आहे. आज युवकांना प्रेरणास्थान असलेले ओंकार ओतारी गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे तहसिलदार पदावर कार्यरत आहेत. |
चित्ररथाद्वारे जिल्ह्यात मतदार जनजागृती जिल्हाधिकारी यांनी दाखविली हिरवी झेंडी
गडचिरोली,दि.10 : विधानसभा निवडणूकमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या मतदान टक्का वाढण्यासाठी चित्ररथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज वेगवेगळया दोन चित्ररथांना हिरवी झेंडी दाखवून चित्ररथाद्वारे प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाला सुरुवात करुन दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ – ठुबे, तहसिलदार एन.एम. ठाकरे, नायब तहसिलदार सुनिल चडगुलवार, सहा. जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, आशिष सोरते, राजू धुडसे, विवेक दुधबळे, दिपक लाकुडवाहे उपस्थित होते.चित्ररथांमध्ये एलसीडी टीव्ही, साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली आहे. त्याद्वारे विविध मतदार जनजागृती व्हिडीओ, जिंगल्स वाजवून मतदारांना माहिती दिली जाणार. तसेच चित्ररथांवर दोन्ही बाजूंनी आकर्षक बॅनर लावून त्याद्वारे मतदान, मतदार, ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅटबाबत लोकांना संदेश दिले जाणार आह.या चित्ररथावर गावोगावी माधूरी दिक्षित यांची मतदारांना आवाहन असलेली जाहिरात, जिल्हाधिकारी यांचे मतदारांना आवाहन, ईव्हिएम, व्हीव्हीपॅट मशीनबद्दल माहिती फिल्म शो द्वारे दाखविली जाणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मतदारांना आवाहन केले आहे की त्यांनी या चित्ररथांद्वारे दिलेले संदेश स्विकारुन दि.21 ऑक्टोबरला मोठया संख्येने मतदानाला उपस्थित रहावे.
शिक्क्याद्वारे मतदान जनजागृती गडचिरोलीमधील नाविन्यपुर्ण उपक्रम
गडचिरोली, दि. 10 : गडचिरोली जिल्ह्यामध्ये आता शासकीय पत्रांवर एक शिक्का दिसणार आहे. त्यामध्ये मतदान दिनांक व वेळ असलेला शिक्का मारलेला दिसेल. मतदारांनी कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा दिवस विसरु नये तसेच त्यांच्यावर मतदान विषयक आठवण म्हणून वेळ लक्षात रहावी यासाठी हा नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेतला आहे.या शिक्क्यामुळे प्रत्येक प्रशासनातील अधिकारी- कर्मचारी यांनाही आपणाला याबाबत जनजागृती करावयाची आहे याची आठवण दररोज होईल. यातून निश्चितच गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रत्येक शासकीय विभागाला आता याबाबत शिक्के पुरविण्यात आले आहेत.




