- खाजगी आस्थापनाधारकांची बैठक
वाशिम, दि. ११ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. सर्व कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता खाजगी आस्थापनाधारकांनी कामगारांना पगारी सुट्टी द्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालींदे यांनी केले. सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्याती विविध संघटना, कामगार, प्रतिनिधी, मालक प्रतिनिधी यांच्या सभेत ते बोलत होते.यावेळी प्रदीपकुमार रॉय (आय.टी.सी लिमिटेड), संतोष चव्हाण (गणपती रुग्णालय), प्रदीप नागे (अध्यक्ष, केमिस्ट ड्रगीस्ट असोसिएशन), प्रविण बाहेती (विठ्ठल मार्केट), गजानन आंबेकर (नाभिक संघ), राजेश लांडे (बाबासाहेब धाबेकर सहकारी सुतगिरणी वाशिम) यांची उपस्थिती होती.
श्री. नालींदे म्हणाले, विधानसभा मतदार संघक्षेत्रातील कामगार, कर्मचारी, अधिकारी निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी देण्याबाबत शासनाने ३ ऑक्टोंबर २०१९ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत आस्थापनेस अधिनस्त कामगारांना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना दोन ते दिन तासांची सवलत देता येईल. मात्र आस्थापनाधारकांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व संबंधित आस्थापनाधारकांनी, व्यवस्थापन प्रतिनिधी यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचे अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घेणार असल्याचे सांगितले. तसेच कोणताही कामगार, कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सांगितले.





