30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ मतदान अधिकाऱ्यांची पथके रवाना; सोमवारला मतदान

मतदान अधिकाऱ्यांची पथके रवाना; सोमवारला मतदान

0
36
????????????????????????????????????

वाशिम, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, २१ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. याकरिता जिल्ह्यातील रिसोड, वाशिम आणि कारंजा या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकाऱ्यांची पथके आज मतदान साहित्यासह मतदान केंद्रांवर रवाना झाली.जिल्ह्यात ९ लाख ५८ हजार ५५१  मतदार आहेत. जिल्ह्यातील सोमवारी १ हजार ५२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघातील ३३१, वाशिम विधानसभा मतदारसंघातील ३६९ व कारंजा विधानसभा मतदारसंघातील ३५२ मतदान केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात ०६ ‘सखी मतदार केंद्रे’ स्थापन केली जाणार आहेत. तसेच प्रत्येक मतदारसंघात एक आदर्श मतदान केंद्र स्थापन केले जाईल. मतदानादिवशी जिल्ह्यातील १०५ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे ‘वेब कास्टिंग’ होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी १ हजार ७८८ बॅलेट युनिट आणि १ हजार ३६० कंट्रोल युनिट तर सुमारे १ हजार ३९९ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ४ हजार ६३६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेतनिर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व १०५२ मतदान केंद्रांवर २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र

मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र नसेल अशावेळी पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासनसार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र अथवा आधारकार्ड यापैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.