- गुरुवारी होणार मतमोजणी; प्रशासनाची तयारी पूर्ण
वाशिम, दि. २३ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. जिल्ह्यात सरासरी ६१.९९ टक्के मतदान झाले. गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर मतमोजणी केली जाणार असून याकरिता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली.
जिल्ह्यात ३३ रिसोड विधानसभा मतदारसंघात ३ लक्ष ०८ हजार ३७८ मतदारांपैकी १ लाख ०८ हजार ८९६ पुरुष मतदार व ९५ हजार ०२९ महिला मतदार अशा एकूण २ लाख ३ हजार ९२५ मतदारांनी मतदान केले. ३४ वाशिम विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४८ हजार ७४९ मतदारांपैकी १ लाख ११ हजार ८४५ पुरुष, ९३ हजार ३६० महिला व एका तृतीयपंथी मतदार अशा एकूण २ लक्ष ५ हजार २०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. ३५ कारंजा विधानसभा मतदारसंघात ३ लक्ष १ हजार ४२४ मतदारांपैकी ९९ हजार ५५१ पुरुष व ८५ हजार ५६७ अशा एकूण १ लक्ष ८५ हजार ११८ मतदारांनी मतदान केले.
रिसोड विधानसभा मतदारसंघात ६६.१३ टक्के, वाशिम विधानसभा मतदारसंघात ५८.८४ टक्के आणि कारंजा विधानसभा मतदारसंघात ६१.४१ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण ९ लक्ष ५८ हजार ५५१ मतदारांपैकी ३ लक्ष २० हजार २९२ पुरुष, २ लक्ष ७३ हजार ९५६ व १ तृतीयपंथी मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यात सरासरी ६१.९९ टक्के मतदान झाले आहे, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सांगितले.
गुरुवारी होणार मतमोजणी
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजलेपासून मतमोजणी सुरु होणार आहे. रिसोड येथील मतमोजणी तहसील कार्यालय प्रशासकीय इमारत येथे, वाशिम येथील मतमोजणी बसस्थानक जवळील कोरोनेशन क्लब येथे तर कारंजा येथील मतमोजणी कृषि उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी निवास गोडाऊनमध्ये होणार आहे. ईव्हीएमवरील मतमोजणीसाठी रिसोड येथे १४, वाशिम येथे २० आणि कारंजा येथे १८ टेबल लावले जाणार आहेत. प्रत्येक टेबलकरिता १ पर्यवेक्षक, १ समवेक्षक व १ सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले.
टपाली मतपत्रिका व सैन्य दलातील मतदारांच्या ईटीबीएस मतपत्रिका मतमोजणीसाठी स्वतंत्र टेबल लावले जाणार आहेत. टपाली मतपत्रिका व ईटीबीएससाठी लावण्यात येणाऱ्या टेबलकरिता प्रत्येकी २ पर्यवेक्षक व २ सहाय्यक नियुक्त केले जाणार आहेत. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले मतमोजणी निरीक्षक व सूक्ष्म निरीक्षक लक्ष ठेवणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.





