गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे धरणस्थळी निदर्शने

0
15

पवनी : राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित असलेल्या गोसीखुर्द धरणाचे भूमिपूजन माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हस्ते २२ एप्रिल १९८८ ला करण्यात आले. या भूमिपूजनाला २७ वर्षे पुर्ण झाले आहेत. या भूमिपूजनाची शासन व अधिकाऱ्यांना आठवण करून देण्याकरीता व गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांकरीता गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त समितीतर्फे बुधवारी, सायंकाळी धरणस्थळी निदर्शने आंदोलन करून, मेणबत्त्या पेटविण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले.

गोसीखुर्द धरणाचे भूमिपूजन २२ एप्रिल १९८८ ला होवून आजपर्यंत ना धरण ना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले. त्यामुळे भूमिपूजनाची आठवण करून देण्याकरीता व प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्याकरीता २२ एप्रिलला धरण स्थळी निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होण्याकरीता संध्याकाळी ५ वाजतापासून आंदोलन स्थळी प्रकल्पग्रस्तांचे येणे सुरू झाले होते. पाथरी, मेंढा, खापरी, सौंदड, नवेगाव, सिर्सी, गोसे बुज, गोसेखुर्द आदी गावातील शेकडो प्रकल्पग्रस्त जमा झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला सुरूवात झाली.

प्रकल्पग्रस्त युवकांना नोकरी अथवा आर्थिक पॅकेज मिळावे, प्रकल्पग्रस्तांना पर्यायी शेतजमिन मिळावी, पेंशन मिळावी, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचा विजय असो आदी घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी समरीत विठोबा यांनी सांगितले की, प्रकल्पग्रस्तांवर नेहमीच सरकारने अन्याय केला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी एकजुट होवून न्याय मागण्याकरीता सहभागी होण्याचे आवाहन केले. संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांनी आंदोलनाने प्रकल्पग्रस्तांचे झालेले फायदे सांगून आता प्रकल्पग्रस्तांची लढाई निर्णायक टप्प्यात आल्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी प्रकल्पग्रस्तांनी धरण स्थळावर शेकडो मेणबत्त्या पेटवून धरणाच्या भूमिपूजनाची आठवण करून दिली. निदर्शनाकडे दुर्लक्ष करून प्रकल्पग्रस्तांची समस्या जाणून न घेतल्यामुळे तहसीलदार नरेंद्र राचेलवार यांचा यावेळी निषेध करण्यात आला.

याप्रसंगी प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक मधुकर गिते, अभियंता चवरे यांना देण्यात आले. या आंदोलनात विलास भोंगाडे, विठोबा समरीत, अंतारमा हटवार, दादा आगरे, वसंता शेंडे, गुलाब मेश्राम, विनोद गणवीर, गुणाराम चुधरी, प्रकाश मेश्राम, परशुराम समरीत, सोमेश्वर भुरे, दिगांबर कुर्झेकर, प्रभू लांजेवार, इस्तारी केवट आदीसह प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते