सुरेंद्रसिंह चंदेल शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख

0
7

गडचिरोली, ता.२३: गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विस्कटलेली शिवसेनेची घडी सावरण्यासाठी शिवसेनेच्या शीर्षस्थ नेतृत्वाने पक्ष संघटनेत बदल करण्याचा निर्णय घेतला असून, काल गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयांच्या नव्या शिवसेना जिल्हाप्रमुखांची घोषणा केली आहे. गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणून सुरेंद्रसिंह चंदेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काल मुंबई येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्याचे वृत्त आज दै.”सामना” मध्ये झळकले. या वृत्तानुसार गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणून सुरेंद्रसिंह चंदेल, चंद्रपूर जिल्हा संघटक म्हणून आ. सुरेश(बाळू) धानोरकर, चंद्रपूर जिल्हाप्रमुख म्हणून सतीश भिवगडे(चिमूर, राजुरा व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र) व अनिल धानोरकर(वरोरा, चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा क्षेत्र) यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. नियुक्तीची माहिती होताच आज चंदेल समर्थकांनी गडचिरोली येथे फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष केला.
सुरेंद्रसिंह चंदेल हे झुंजार लोकनेते म्हणून ओळखले जातात. शेतकरी, मजूर, ओबीसी व आदिवासींवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी अनेकदा मोठमोठी आंदोलने केली आहेत. मूळचे कुरखेडा येथील रहिवासी असलेले सुरेंद्रसिंह चंदेल हे १९८७ मध्ये शिवसेनेचे कुरखेडा शहरप्रमुख झाले. पुढील एक वर्षातच त्यांना तालुकाप्रमुख करण्यात आले. १९८८ ते १९९४ पर्यंत ते तालुकाप्रमुख होते. पुढे १९९५ मध्ये त्यांची उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९९९ पर्यंत ते या पदावर होते. त्यानंतर १९९९ ते २००९ पर्यंत ते जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात शिवसेनेने जिल्हा परिषद व अनेक पंचायत समित्यांमध्ये वर्चस्व निर्माण केले होते. परंतु त्यावेळी शिवसेनेने हरीश मने यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याने श्री. चंदेल यांनी २०१० मध्ये युवा शक्ती संघटनेत प्रवेश करुन जिल्हाभर या संघटनेचे जाळे निर्माण केले होते. मात्र २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत युवा शक्ती संघटनेच्या नेत्यांची मतभेद झाल्याने त्यांनी या संघटनेपासून फारकत घेऊन ऑगस्ट २०१४ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांना जिल्हाप्रमुखपदाची प्रतीक्षा होती. आज शिवसेनेने त्यांच्या नावाची घोषणा केल्याने पुन्हा जिल्हयात शिवसेना बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सुरेंद्रसिंह चंदेल हे जिल्हा परिषद सदस्यही होते. वेगवेगळया कारणांसाठी आंदोलन केल्याने त्यांच्यावर सुमारे ४२ खटले दाखल आहेत. बऱ्याच खटल्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून, आता ९ खटले शिल्लक असल्याची माहिती आहे.