|
भंडारा,दि.25ः- विधानसभा निवडणुकीत विजयाचे स्वप्न बघणार्या भाजपचा जिल्ह्यातील तिनही मतदारसंघात त्रिफळा उडाला आहे. २0१४ मध्ये एकहाती आलेल्या तीनही जागा भाजपला गमवाव्या लागल्या आहेत. तुमसर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे यांनी अपक्ष उमेदवार चरण वाघमारे यांचा पराभव केला. भंडारा येथे शिवसेनेचे बंडखोर नरेंद्र भोंडेकर यांनी कमबॅक करीत भाजप युतीचे अरविंद भालाधरे यांचा पराभव केला. तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या साकोली येथे अटीतटीच्या लढतीत कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपचे डॉ. परिणय फुके यांना पराभवाची धूळ चारली. तीनही विधानसभेतील या अनपेक्षित निकालामुळे भाजप पदाधिकार्यांची झोप उडाली आहे.
तुमसर येथे सुरुवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजू कारेमोरे, भाजपचे प्रदीप पडोळे व अपक्ष चरण वाघमारे यांच्यात तिहेरी लढतीचे चित्र होते. परंतु, मतमोजणीच्या फेर्या पुढे सरकत असताना भाजपचे प्रदीप पडोळे हे बरेच मागे राहीले. त्यानंतर राजू कारेमोरे व चरण वाघमारे अशीच थेट लढत शेवटपर्यंत राहीली. दोघांमध्येही अटीतटीची लढत होत असल्याने अखेरच्या क्षणी कोण निवडून येईल, याकडे अनेकांचे लक्ष होते. कधी राजू कारेमोरे तर कधी चरण वाघमारे यांनी मतांची आघाडी घेतली होती. परंतु, अखेरच्या क्षणी राजू कारेमोरे यांनी अपक्ष चरण वाघमारे यांचा पराभव केला. शेवटची आकडेवारी हाती आली तेव्हा राजू कारेमोरे यांना ८५ हजार ८९६ मते मिळाली होती. तर चरण वाघमारे यांना ७८ हजार ५३३ मते मिळाली. भाजपचे प्रदीप पडोळे यांना ३३ हजार ३३ मते मिळून ते तिसर्या क्र मांकावर राहीले. राजू कारेमोरे हे ७ हजार ३६३ मतांनी पुढे होते.
भंडारा येथे अपेक्षेप्रमाणे भाजप युतीचे अरविंद भालाधरे व अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांच्यात थेट लढत झाली. पहिल्या फेरीपासूनच भोंडेकर यांनी मतांची आघाडी घेतली होती. ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. दुसर्या फेरीत नरेंद्र भोंडेकर यांनी ३ हजार ७३७ मतांची आघाडी घेतली होती. तिसर्या फेरीत ही आघाडी ४ हजार ७१६ इतकी वाढली होती. आठव्या फेरीअखेर ही आघाडी साडेआठ हजारांवर पोहोचली होती. तर १८ व्या फेरीपर्यंत साडेअकरा हजारांची आघाडी नरेंद्र भोंडेकर यांनी घेतली होती. कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार जयदीप कवाडे यांनी १८ व्या फेरीपर्यंत १४ हजार १६४ मतांपर्यंत मजल मारली होती. उशिरापर्यंत आकडेवारी हाती आले तेव्हा नरेंद्र भोंडेकर यांना १ लाख १ हजार ७१७ मते, भाजप युतीचे अरविंद भालाधरे यांना ७८ हजार ४0 मते तर कॉंग्रेस आघाडीचे जयदीप कवाडे यांना १९ हजार १0५ मते मिळाली होती. नरेंद्र भोंडेकर हे २३ हजार ६७७ मतांनी आघाडीवर राहीले.
साकोली विधानसभेच्या निकालाने शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय धुरीणांच्या नजरा रोखून धरल्या होत्या. भाजपचे डॉ. परिणय फुके व कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्या उमेदवारीमुळे ही जागा प्रतिष्ठेची होती. तिसर्या फेरीपर्यंतचे निकाल हाती आले तेव्हा परिणय फुके हे १ हजार १६७ मतांनी आघाडीवर होते. सहाव्या फेरीपर्यंत परिणय फुके यांनी १ हजार ८९१ मतांची आघाडी घेतली होती. परंतु नवव्या फेरीत परिणय फुके यांची आघाडी ५५९ वर घसरली होती. फेरीनिहाय मतांचे आकडे बदलत असल्याने दोन्ही पक्षांमध्ये धाकधुक वाढली होती. ११ व्या फेरीत मात्र नाना पटोले यांनी आघाडी घेतल्याने कॉंग्रेस खेम्यात उत्साह संचारला होता. १६ व्या फेरीत नाना पटोलेंची आघाडी १ हजार ६५८ पर्यंत पोहोचली होती. उशिरापर्यंंतचे मतांचे आकडे हाती आले तेव्हा नाना पटोले यांना ९३ हजार ५७२ मते, भाजपचे डॉ. परिणय फुके यांना ८७ हजार ५ मते तर वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांना ३३ हजार ६८0 मते मिळाली होती. नाना पटोले हे ६ हजार ५६७ मतांनी आघाडीवर होते.
तीनही उमेदवारांच्या विजयानंतर त्यांच्या सर्मथकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली. या निवडणुकीत नोटाला ५ हजार ९0२ मतदारांनी पसंती दिली होती.
|