25.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ आधारभूत केंद्रावर हेक्टरी ३६ क्विंटल धान खरेदी होणार

आधारभूत केंद्रावर हेक्टरी ३६ क्विंटल धान खरेदी होणार

0
63

आमदार रहागंडाले व अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश
गोंदिया,दि. ४ ः-दिवाळीनंतर खरीप धानपिकाची कापणी झाल्यानंतर त्या धानपिकाच्या विक्रीच्यावेळी शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून लूट होऊ नये, यासाठी धानाच्या खरेदीकरिता शासनाकडून एजेंसीच्या मार्फत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येते. यावर्षी धान खरेदी केंद्रावर गोंदिया जिल्ह्यातील कृषी अधिक्षक कार्यालयाने दिलेल्या आपल्या प्राथमिक अहवालानुसार हेक्टरी २३ क्विंटल धान खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.जेव्हा की उत्पादन क्षमता अधिक असल्याने शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पादीत धान कुठे विक्री करावा, असा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली होती.तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार व गोंदियाचे आ. विनोद अग्रवाल यांच्याकडे मतदारसंघातील नागरिक व शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारीमुळे लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी व कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिक्षकांशी चर्चा करुन धान खरेदीच्या मर्यादेत वाढ करण्यासंदर्भात पुढाकार घेतला.यावर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा कृषी अधिक्षकांशी चर्चा केली असता जिल्हा कृषी अधिक्षकांनी चार टप्यानुसार पिकाचा उत्पादन अंदाज तयार केला जातो,त्यानुसार सध्याच्या परिस्थितीकडे व उत्पादनाकडे बघता पहिल्या टप्यातील २३ क्विंटलएैवजी हेक्टरी ३६ क्विंटल उत्पादन क्षमता असल्याचे सांगितले.तसेच त्यानंतरही पिकाच्या आणेवारीच्या अंतिम अहवालापर्यंत यात वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे सांगितल्याने जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनी हेक्टरी ३६ क्विंटल प्रमाणे  धान खरेदी करण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग अधिकारी मार्फेत सर्व शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राना देण्यात आले.या निर्णयामुळे गोंदिया जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर आता धान हेक्टरी ३६ क्ंिवटल धान शेतकर्‍यांला विक्री करता येणार आहे. या निर्णयाबद्दल शेतकर्‍यांनी आमदार रहागंडाले व आ. अग्रवाल यांचे आभार मानले आहे.
शासनाकडून जिल्ह्यात २ एजेंसीच्या माध्यमातून आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र धान खरेदी केंद्रावर हेक्टरी २३ क्विंटल धान खरेदीची मर्यादा असल्यामुळे शेतर्‍यांना अतिरिक्त धान विक्री करण्यास अडचण निर्माण होत असे. पर्यायाने शेतकर्‍यांना कमी दरात व्यापार्‍यांच्या बळी पडावे लागत होते. धान खरेदी केंद्राची मर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात होती. जिल्हाधिकारी कार्यालयात (दि.3)झालेल्या बैठकीत आमदार रहागंडाले व आ.अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे व कृषी अधिक्षक नाईनवाड,जिल्हा मार्केटिंग अधिकारी खर्चे यांच्यासह इतर अधिकार्‍यांशी चर्चा केली.