गोंदिया,दि.14: स्वच्छ भारत मिशनअंर्तगत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ५४५ ग्रामपंचायतींमधील १७१० वॉर्डांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यातील ५४५ वॉर्डांना प्रत्येकी १० हजारांचे पारितोषिक मिळणार आहे. त्यातच १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत जि.प.गटनिहाय गावांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत ५३ जि.प.गटनिहाय गावांची नावे निश्चित करण्यात आली असून या गावांपैकी प्रथम ३ गावांची निवड विभागीयस्तरावर होणार आहे. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या गावांतून निवड होणार आहे. जि.प. गटनिहाय प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार असून विभागस्तरावर प्रथम क्रमांक येणार्या ग्रामपंचायतीला ५ लाख, द्वितीय ३ लाख व तृतीय २ लाख त्याचप्रमाणे राज्यस्तरावर प्रथम येणार्या ग्रामपंचायतीला २५ लाखांचे पुरस्कार देण्यात येणार आहे.स्वच्छ ग्राम स्पर्धेचा कार्यक्रम ऑक्टोबर महिन्यातच सुरू व्हायला पाहिजे होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लागलेल्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम लांबला. त्यामुळे हा कार्यक्रम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला असून २९ फेब्रुवारीपर्यत हा कार्यक्रम चालणार आहे.
स्वच्छ भारत मिशन अभियानाच्यावतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांर्तगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व ५४५ ग्रामपंचायतींची तपासणी ३० नोव्हेंबरपूर्वी करण्यात येणार आहे. सदर ग्रामपंचायतींची तपासणी ही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय समिती गठीत करून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील ६ जिल्हा परिषद क्षेत्रातील ५७ ग्रामपंचायती, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ७ जिल्हा परिषद क्षेत्रातील ७० ग्रामपंचायती, देवरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद क्षेत्रातील ५७ ग्रामपंचायती, गोंदिया तालुक्यातील १४ जिल्हा परिषद क्षेत्रातील १०९ ग्रामपंचायती, गोरेगाव तालुक्यातील ५ जिल्हा परिषद क्षेत्रातील ५५ ग्रामपंचायती, सडक अर्जुनी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद क्षेत्रातील ६३ ग्रामपंचायती, सालेकसा तालुक्यातील ४ जिल्हा परिषद क्षेत्रातील ४१ ग्रामपंचायती तर तिरोडा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद क्षेत्रातील ९५ ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात येणार आहे. सदर ग्रामपंचायतींची तपासणी पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, परिसर स्वच्छता तसेच वैयक्तिक स्वच्छता या मुद्यांच्या आधारावर करण्यात आली. जि.प. गटनिहाय प्रथम येणार्या ५३ ग्रामपंचायती विभाग व राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र ठरू शकतात. विशेष म्हणजे, मागील वर्षीही जिल्ह्यातील ग्राम पंचायतींनी हिरहिरीने सहभाग घेतला होता. मात्र, जिल्ह्यातील ग्राम पंचायती विभाग अथवा राज्यस्तरावर पुरस्कारासाठी पात्र ठरल्या नव्हत्या. त्यामुळे किमान यंदातरी ग्राम पंचायती चांगली कामगिरी करून पुरस्कारासाठी पात्र ठरतील, असा विश्वास यंत्रणेने केला आहे.
तीन विशेष पुरस्कार
स्वच्छ ग्राम स्पर्धेत निवडलेल्या ग्राम पंचायती व्यतिरिक्त जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर द्यावयाच्या विशेष पुरस्काराची अंमलबजावणी सन २०१९-२० पासून करण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ स्पर्धा अंतर्गत विशेष पुरस्कारामध्ये स्व.वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार, जिल्हास्तरावर २५ हजार, विभाग स्तरावर ३० हजार व राज्यस्तरावर २ लाख रूपये प्रमाणे मिळणार आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन शिवाय स्व.आबासाहेब खेडकर शौचालय पुरस्कार यामध्ये अनुक्रमानुसार पुरस्कार मिळणार आहे. ग्राम पंचायतच्या वॉर्डांची तपासणी ग्रामसेवक यांच्या अध्यक्षतेखाली संबधित गावातील शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक/सेविका तसेच जि.प.गटासाठी विस्तार अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी पर्यवेक्षक, आरोग्य पर्यवेक्षक व केंद्र प्रमुख करणार आहेत. तपासणीचा अहवाल खंडविकास अधिकार्यांना सादर करून खंडविकास अधिकारी आपला अंतिम अहवाल जिल्हा परिषद व त्यानंतरच वॉर्ड तसेच ग्राम पंचायती मोहिमेत यशस्वी झाल्याचे जाहिर करण्यात येणार आहे.





