लाखनी,दि.21 ःया देशात पशूूंची गणना होते. परंतु, ओबीसींची जनगणना होत नाही, हा ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. २0२१ ला जनगणना होत आहे. या जनगणनेत ओबीसींची जनगणना व्हावी, असे मत संजयराव वणवे यांनी व्यक्त केले.कोलारी येथे आयोजित जनगणना परिषदेत ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रा. उमेश सिंगनजुडे, प्रमुख मार्गदर्शक डॉ. अमित गायधनी, आनंदराव उरकुडे, गोपाल नाकाडे, सुनिल चाफले, जितेंद्र बोंद्रे उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून प्रा. उमेश सिंगनजुडे म्हणाले, संविधानात सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला आरक्षण देण्यात आले. मागास प्रवर्गाचा विकास व्हावा, याकरिता एससी, एसटी यांची जनगणना केली जाते. पण, मागासप्रवर्गातील ओबीसी या प्रवर्गाची जनगणना केली जात नाही. परिणामी, त्यांच्या कल्याणकारी व विकासात्मक योजना राबविल्या जात नाही. हा ओबीसी प्रगर्व विकासापासून वंचित राहिला आहे. ओबीसींचा विकास व्हावा याकरिता ओबीसींची जनगणना करावी, असे मत व्यक्त केले.
यावेळी ओबीसी जनगणना परिषद कोलारीची कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्ष म्हणून मुकेश सिंगनजडे, उपाध्यक्ष रत्नाकर नांदगावे, सचिव संजय हेमणे, सहसचिव रतन मेर्शाम, कोषाध्यक्ष सुरज झंझाड, प्रसिद्धी प्रमुख डोलिराम झंझाड, सदस्य शोभा ठवकर, भारती खंडाईत, दिगांबर बावनकुळे यांची निवड करण्यात आली.




