Ø 9 डिसेंबरपर्यंत मुदत,Ø तहसिल कार्यालयात अर्ज उपलब्ध
भंडारा( जिमाका ), दि,29:- 1 नोव्हेंबर 2019 पूर्वी किमान तीन वर्ष पदवी-पदविका धारण केलेल्या पदवीधर मतदारांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी , डॉक्टर व पदवीधर तरुणांनी आपले नाव या मतदार यादीत नोंदविण्यासाठी 9 डिसेंबर पर्यंत मुदत असल्याचे त्यांनी सांगितले.
पदवीधर मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी सर्व तहसिल कार्यालयात अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच उपजिल्हाधिकारी निवडणूक यांच्या कार्यालयातही अर्ज ठेवण्यात आले आहेत. सर्व पदवीधर तरुण-तरुणींनी या पदवीधर यादीत आपले नाव नोंदवावे. आज जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपजिल्हाधिकारी निवडणूक येरचे व अधिकारी उपस्थित होते.
नमुना 18 दिनांक 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत स्विकारण्यात येईल. त्यानंतर स्विाकरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. अर्जासोबत विद्यापीठाने दिलेली पदवी किंवा पदवीका प्रमाणपत्र, गुणपत्रिका व एक पासपोर्ट साईज फोटो सादर करणे आवश्यक आहे. नमुना 18 मध्ये अर्ज पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे सादर करावा. नमुना 18 मधील छापील अर्ज सहाय्यक मतदान अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयात प्राप्त होईल त्यासह हस्तलिखीत, टंकलिखित, चक्रमुद्रित किंवा खाजगीरित्या छापील अर्ज देखील स्विकारले जातील.
विद्यापीठ किंवा संबंधित संस्था यांनी दिलेले मुळ पदवी, पदविका प्रमाणपत्र किंवा यथोचितरित्या स्वयंसाक्षांकित आणि यथोचितरित्या कोणत्याही अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी जो तहसिलदार, शासकीय पदवी महाविद्यालय, आंतर महाविद्यालय यांचे प्राचार्य, मुलींचे शासकीय पदवी महाविद्यालय, आंतर महाविद्यालय यांचे प्राचार्य, सर्व गटाचे गट विकास अधिकारी, नगरपालिका, नगरपंचायतीचे (राजपत्रित) कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हयाचे सर्व राजपत्रित अधिकारी, करार व दस्त ऐवजांवर दाखले देणारा अधिकारी ( नोटरी पब्लीक ) यांनी यथोचितरित्या प्राधिकृत केलेली प्रत.
गट्टा पध्दतीने अर्ज सादर करता येणार नाही. परंतु कुटूंबप्रमुख त्यांच्या कुटूंबातील, कार्यालय प्रमुख किंवा संस्था प्रमुख त्यांच्या स्थापनेंतर्गत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रित करुन पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे सादर करु शकतात. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पदनिर्देशित अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे कार्यालयात पदवीधर मतदार संघ प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या यादीमध्ये कुठल्याही प्रकारचे चूका ( जसे नावात, पत्त्यात, लिंगात बदल ) असल्यास त्याबाबत कळविण्यात यावे, असे म्हंटले आहे.





