सालेकसा,दि.01 तालुक्यातील बहुतांश भाग जंगलाने व्यापलेला आहे. वनविभाग आणि वनविकास महामंडळ विभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात पसरले आहे. एफडीसीएम अंतर्गत येत असलेल्या जंगलात सागवान मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आकाराने मोठे वृक्ष येथे आहेत. परंतु सध्या तस्करांची नजर सागवान वृक्षांवर गेली आहे. सागाच्या वृक्षांची अवैध कत्तल केली जात आहे.दरेकसा परिसरातील अंबाझरण, दिल्ली गेट, गेंडूरझिरिया, कचारगड भागात तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. मोठाल्या सागवान वृक्षांची कत्तल करून रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत रेतीच्या ट्रक्टरमधून तस्करी करण्यात येत आहे. सालेकसा ते दरेकसा रेल्वेमार्ग परिसरात स्थानिकांच्या मदतीने तस्कर वृक्षांची कत्तल करून ठेवतात. झाडे वाळली की गरजेप्रमाणे त्याचे तुकडे केले जातात. त्यानंतर या झाडांची तस्करी केली जाते. रविवार सुटीच्या दिवशी शासकीय कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचा गैरफायदा तस्कर घेतात. रविवारच्या रात्री उशिरा मोठी वाहने जंगलात नेऊन कापलेली व आवश्यक आकाराची लाकडे भरून चोरून नेली जातात. धनसुवा, बोरी, नवाटोला परिसरातील मोठे सागवान वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे शासनाकडून वृक्षलागवडीचे धोरण अवलंबिले जात आहे, तर दुसरीकडे झाडांची कत्तल केली जात आहे. शासकीय अधिकारी, कर्मचाèयांनी मुख्यालयी राहून वनांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.





