गडचिरोली,दि.01 : महिला सक्षमीकरणासाठी आजच्या बदलत्या युगात डिजीटल साक्षरता महिलांसाठी खूप महत्वाची आहे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांच्या सहकार्याने अभिनव संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या महिलांच्या कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या.यावेळी उद्घाटक म्हणून अनुसया गुप्ता, सदस्य महाराष्ट्र राज्य महिला आयोग (विदर्भ विभाग) उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहूणे म्हणून योगिता पिपरे, नगराध्यक्ष, प्रंचित पोरेड्डीवार, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इत्यादी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शकांनी डिजीटल साक्षरतेबाबत विविध विषयावर मार्गदर्शन केले. महिलांनी सोशल मीडिया सोडून इतर ॲपची माहिती घेणे गरजेचे असून त्यांनी विविध कामे डिजीटल स्वरुपात अंगिकारणे महत्वाचे आहे असे आयोगाच्या सदस्या गुप्ता यांनी सांगितले. या कार्यक्रमात महिलांना घरगूती वापरासाठी लघूउद्योग व्यवसायासाठी बँकींग क्षेत्रात तसेच अन्य अनेक विषयावर आधारीत मोबाईल इंटरनेटचा वापर कसा करावा याबाबत नाशिक येथून आलेले मार्गदर्शक चेतन पाटील यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आयोजन अभिनव बहुउद्देशिय कला मंच गडचिरोली यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड राजेंद्र चौधरी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अखिल शेख यांनी मानले.





