Ø अवैध धंदयांना आळा घाला
Ø आरोग्य, शिक्षण व सिंचनाला प्राधान्य
Ø पाण्याचा आराखडा तयार करा
भंडारा दि. 5 :- जिल्हयातील 67 धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाचे चुकारे आठ दिवसात करण्यात यावे, असे निर्देश महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी जिल्हा पणन अधिकारी यांना दिले. धान खरेदीसाठी वाढीव धान खरेदी केंद्र सुरु करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आरोग्य, शिक्षण, सिंचन, पिण्याचे पाणी, गासेखुर्द पुनर्वसन व रोजगार हे प्राधान्याचे विषय असून जिल्हा प्रशासनाने या विषयाचा नियोजन आराखडा तयार करुन तात्काळ अंमलबजावणी करावी, स्पष्ट निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, एस.एस. भस्के, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
खरीप हंगाम 2019-20 मध्ये 2 लाख 90 हजार 612 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून खरेदी किंमत 52 कोटी 74 लाख 61 हजार एवढी आहे. धानाच्या चुकाऱ्याचे 28 कोटी प्राप्त झाले असून आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. 24 कोटी रुपये निधीची आवश्यकता असून हा निधी तात्काळ मिळवून दिला जाईल, असे अध्यक्षांनी सांगितले. धानाची भरडई करण्यासाठी तात्काळ निविदा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. धान खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी आमदार राजु कारेमोरे व नरेंद्र भोंडेकर यांनी केली असता अध्यक्षांनी केंद्र वाढविण्याच्या सूचना दिल्या.
आरोग्य, शिक्षण व सिंचन हे विषय जिल्हयासाठी प्राधान्याचे असून जिल्हयातील सर्व आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय अद्ययावत ठेवण्यात यावे, असे ते म्हणाले. रुग्णांना नागपूरला किंवा खाजगी रुग्णालयात रेफर करण्याची वेळ येवू देवू नका. औषध साठा पुरेसा ठेवण्यात यावा, असे सांगून अध्यक्ष म्हणाले की, रिक्त जागा भरण्यासंदर्भात आरोग्य विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेण्यात येईल. जिल्हयातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे शासनाचे कर्तव्य असून शिक्षण विभागाने दर्जेदार शिक्षणाची सोय करावी. वर्ग खोल्यांसाठी निधीची उपलब्धता केली जाईल. तसेच रिक्त जागा भरण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.
कायदा व सुव्यवस्था या संदर्भात बोलतांना अध्यक्ष म्हणाले की, रेती तस्करी व अवैध धंदयावर तात्काळ आळा घालण्यात यावा. महसूल प्रशासन व पोलीस विभागाने या संबंधी तात्काळ कारवाई करावी. जिल्हा अवैध धंदे मुक्त करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाने पार पाडावी, असे ते म्हणाले. घरकुलांसाठी रेती उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधितांना सूचना दयाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
सिंचनाचा विषय प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी जिल्हयाचा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. यावर्षी पिण्याचे पाण्याची टंचाई जाणवणार नसली तरी पुढील 25 वर्षाच्या पिण्याच्या पाण्याचे तसेच सिंचनाचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. यासाठी सिंचन विभागाने आराखडा तयार करावा. गोसीखुर्द पुनर्वसनाबाबत बोलतांना अध्यक्ष म्हणाले की, प्रलंबित मोबदला तातडीने वितरित करावा. सिंचनाच्या प्रश्नासंबंधी जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक घ्यावी, असे त्यांनी सूचविले. आलेसूर व गोबरवाही पाणी पुरवठा योजनेसंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हयात भात पिकाखालील सर्व साधारण क्षेत्र 1 लाख 89 हजार 237 असून ऑगस्ट अखेर 39 हजार 440 हेक्टरवर रोवणी झाली आहे. जिल्हयातील 1 लाख 54 हजार 641 शेतकऱ्यांनी भात पिक विमा उतरविला असून पिक लावणीपुर्व नुसार प्रती हेक्टर 9 हजार 62 रुपये लाभ मिळण्यासाठीची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी काढली आहे. याबाबत सचिव स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्ष यांनी यावेळी सांगितले. घरकुलाचा आढावा घेतांना गरजुंना घरकुल मिळावे, असे निर्देश त्यांनी दिले. याबाबत लाभार्थ्यांची अडवणूक होता कामा नये. उन्हाळी धान, अंशकालीन पदभरती, पाणी टंचाई, कुशल कामाचे पैसे व पिकनुसार आदी विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आलेल्या नानाभाऊ पटोले यांचे जिल्हयात भव्य स्वागत करण्यात आले. मौदा, चिखली, जवाहर नगर पेट्रोल पंप, शहापूर, मुजबी, बेला, नागपूर नाका, विश्रामगृह व जिल्हाधिकारी कार्यालय येथे नागरिकांनी त्यांचे भव्य स्वागत केले.





