भंडारा,दि.06ः- सोन्याच्या भावात विकली जात असलेली जिल्ह्यातील रेती आणि जीवनदायिनी असलेली वैनगंगा अशा दोन्हींची अवस्था सध्या बिकट आहे. दूषित झालेली वैनगंगा आणि अवैधरीत्या होत असलेले रेतीचे उत्खनन या दोन्ही समस्यांना खासदार सुनील मेंढे यांनी संसदेच्या सभागृहात मांडून सरकारकडून न्याय देण्याची मागणी केली. ४ डिसेंबर रोजी खासदार सुनील मेंढे यांनी यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित करीत वास्तव सरकारसमोर मांडले. भंडारा जिल्ह्यातून वाहणारी वैनगंगा नदी जिल्ह्यासाठी दोन्ही अर्थाने वरदान आहे. या नदीचे पाणी पिण्यासोबतच अन्य गरजांसाठीही वापरण्यात येते, तर दुसरीकडे या नदीतील रेतीला बांधकामाच्या क्षेत्रात प्रचंड मागणी आहे. सोन्याप्रमाणे िकंमत असलेल्या या
रेतीची होत असलेली चोरी हा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. वैनगंगा नदीतून नदी काठावरील अनेक गावांसह भंडारा आणि पवनी शहरांना पाणीपुरवठा होतो. मात्र आज या नदीचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. नागपूर शहरातील घाण पाणी, एनसीपीटीसारख्या ऊर्जा प्रकल्पातील रसायनयुक्त पाणी या नदीत मिसळून पाणी दूषित झाले आहे. नदी पात्रात वाढलेल्या जलपर्णी वनस्पतीमुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी झाला आहे. दूषित झालेल्या या वैनगंगेचा प्रश्न नेहमीच चर्चेत येतो.सोबतच रेतीच्या अवैध उत्खननाचा विषय, या दोन्ही विषयांना भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. मार्च २०१९ मध्ये प्रदूषण महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ५० नद्या प्रदूषित घोषित करण्यात आल्या. त्यात वैनगंगा होती. विविध कारणांनी प्रदूषित झालेल्या नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात व रेतीचे अवैध होणारे उत्खनन थांबावे म्हणून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी खासदार मेंढे यांनी सभागृहात केली.





