गडचिरोली,दि.08ः-जिल्ह्यात एकमेव असलेल्या चामोर्शी तालुक्यातील घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयातील समस्या सोडविण्याची मागणी खा. अशोक नेते यांनी आज शनिवारी नवोदय विद्यालय समितीचे अध्यक्ष तथा केंद्रीय मानव संसाधन मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांची दिल्ली येथे भेट घेवून निवेदनातून केली आहे.
चामोर्शी तालुक्यातील घोट येथे १९८६ मध्ये निर्माण करण्यात आलेल्या नवोदय विद्यालयात सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे प्रतिकुल परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. येथील अडचणी तत्काळ सुटाव्यात व विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी खा. अशोक नेते यांनी नवोदय विद्यालय समितीचे अध्यक्ष तथा केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांची दिल्ली येथे भेट घेऊन समस्यांचे निवेदन सादर केले. याबाबत खा. नेते यांनी केंद्रीय मंत्री डॉ. पोखरियाल यांच्याशी सविस्तर चर्चा करून नवोदय विद्यालयाच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. केंद्रीयमंत्री पोखरियाल यांनी समस्यांबाबत माहिती घेऊन लवकरच समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले





