गोंदिया,दि.23ः-राकाँचे नेते शरद पवार व खा. प्रफुल्ल पटेल यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागपूर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, २१ डिसेंबर रोजी धान पिकाला अडीच हजार रुपये दराची घोषणा केली.गत वर्षी शरद पवार हे गोंदिया येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेले असताना खा. प्रफुल्ल पटेल यांनी धानाला अडीच हजार रुपये भाव देण्याची मागणी केली होती. त्यावेळी शरद पवार यांनी गोंदिया येथील पत्रपरिषदेत आपली सरकार सत्तेत आल्यास आपण धानाला यापूर्वी जाहीर ५00 रुपये बोनस व २00 रुपये वाढीव दर असा अडीच हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, खा. प्रफुल्ल पटेल यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करीत होते, तर शरद पवार यांनी दिलेले आश्वासनांची पूर्तता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विधानसभेच्या अधिवेशनात पूर्ण केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी धानाला सरसकट अडीच हजार रुपये भाव जाहीर केला. धानाला अडीच हजार रुपये दर व शेतकर्यांना कर्जमाफीच्या शासनाच्या निर्णयाबद्दल शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.याबद्दल राकाँचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, खा. पटेल यांचे माजी आ. राजेंद्र जैन, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील राकाँचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकर्यांनी आभार व्यक्त केले आहे.




