सायबर गुन्हे कार्यशाळेत प्रतिपादन
गडचिरोली,दि.03: सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षा हा विषय डिजीटल युगात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यासाठी महिलांनी डिजीटल साक्षर होवून ‘सायबर सुरक्षित महिला’ अभियानास गती दिली पाहिजे असे प्रतिपादन सायबर विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी केले. महिलांसाठी सायबर सुरक्षा या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत फुले- आंबेडकर समाजकार्य विद्यालयात ते बोलत होते. पोलीस विभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली बांबोळे व विद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सुरेश खांगर उपस्थित होते.
यावेळी अजित राठोड यांनी महिलांवरील वाढते सायबर हल्ले, त्याबाबत असलेले कायदे समाजकार्य विभागात शिकत असलेल्या विद्यार्थीनींना सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या व महिला समुपदेशक वैशाली बांबोळे यांनी महिला अत्याचार व त्याबाबत असलेले कायदे यावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की तरुण पिढीला सोशल मिडीयाने ग्रासले आहे. आपण त्याच्या आहारी जावून नकळत गुन्हे करुन बसतो. सोशल मिडीयावरील तयार झालेली तात्पुरती ओळख आपल्याला कधी अडचणीत आणेल हे सांगता येत नाही. मग अशा परिस्थितीत महिलांवर अत्याचार होतात. महिलांनी आपल्यावर झालेले अन्याय न लपवता त्याबाबत तक्रार वेळीच केली पाहिजे. त्यामुळे गुन्हे करणाऱ्यांवर आळा बसेल. या कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी यांनी विविध उदाहरणे देवून सायबर गुन्हे उपस्थितांना सांगितले. समाजकार्य विद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सुरेश खांगर यांनी समाजाबरोबरच महिलाही काही प्रमाणात सायबर गुन्हे घडविण्यास कारणीभूत असतात. विनाकारण आपण आपली नको ती महिती उघड करत असतो. मग अशावेळी ते गुन्हेगाराला पाचारण केल्या सारखे होते. त्यातूनच मग गुन्हे वाढतात असे ते म्हणाले. यासाठी महिलांनी इंटरनेटवर खाजगी आयुष्यातील कोणती माहिती सार्वजनीक करावी याबाबत विचार करावा असे ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला पोलीस विभागाचे सहा. उपनिरीक्षक खुशाल गेडाम, पायल टेंबुर्णे, गणेश मोहिते उपस्थित होते. फुले- आंबेडकर समाजकार्य विभागाच्या प्रा. प्रज्ञा वनमाली, प्रा.कविता उईके, प्रा.सरीता बुटले, कु.कांदबरी केदार, कु.अनिता ठाकुर उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी सहायता मेश्राम तर आभार प्रा. उईके यांनी मानले. कार्यक्रम आयोजनाचे कार्य प्रा.रुपेंद्र कुमार गौर, प्रा. दिपक तायदे, प्रा. हितेश चरडे, प्रा.सुरेश कांती यांनी पार पाडले.





