36.1 C
Gondiā
Monday, June 29, 2026
Home विदर्भ महिलांनी चुल आणि मुल नाही तर मोठमोठे व्यवसाय सांभाळावे-आमदार सहसराम कोरोटे

महिलांनी चुल आणि मुल नाही तर मोठमोठे व्यवसाय सांभाळावे-आमदार सहसराम कोरोटे

0
46

: महिला रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा

सालेकसा, दि.4 : लघु उद्योगाच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास करण्यासाठी शासन स्तरावर बचत गटातील विविध मागणीचे प्रस्ताव शासनासमोर मांडणार. महिलांनी पुढाकार घेऊन व्यवसाय करावे. तसेच महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य ते विक्री चे प्लेटफॉर्म मिळावे यासाठी लागेल त्या वेळी मदत करणार, महिला बचत गटातील महिलांसाठी बचत भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रतिपादन आमदार- सहसराम कोरोटे ,आमगाव – देवरी विधानसभा संघ यांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती गोंदिया, नियोजन विभाग महाराष्ट्र शासन; सहारा , स्त्रीगौरव, जयसेवा लोकसंचालीत साधन केंद्र, ता. सालेकसा यांच्या संयुक्त विधमाने,  अर्धनारेश्वरालय हलबीटोला येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रामुख्याने अर्चनाताई राऊत सभापती, पं. स. सालेकसा, दिलीप वाघमारे उपसभापती , पं. स. सालेकसा,  जया डोये सदस्य, हिरालाल फाफनवाडे सदस्य, प्रतिभा परिहार, भरत लिल्हारे सदस्य, पं. स. सालेकसा, सी.जी. पित्तेलवार तहसीलदार, नंदकिशोर साखरे सदस्य जि.प्र.मु. समिती गोंदिया तसेच  डॉ. सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्ता गोंदिया, रजनी रामटेके , जिल्हा समन्वयक राज्य महिला आयोग, श्री पाथोडे  ICICI बँक गोंदिया उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुनील सोसे जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया यांनी केले.  त्यांनी विभागांतर्गत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाविषयी माहिती दिली. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कसा घेता येईल या विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी २० महिलांना १५ लक्ष रुपयाचे मुद्रा कर्जाचे वाटप करण्यात आले. उतकृष्ठ गट म्हणून लक्ष्मी व आदर्श गट आमगाव खुर्द तसेच उत्कृष्ठ ग्रामसंस्था म्हणून संजीवनी ग्रामसंस्था दरबडा यांचे सत्कार करण्यात आले. महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे एकुण १२ स्टाल लावण्यात आलेले होते. तसेच मानव विकास योजना अंतर्गत कृषी अवजार बँक ची पाहणी करण्यात आली. तसेच सहारा , स्त्रीगौरव, जयसेवा लोकसंचालीत साधन केंद्र, ता. सालेकसा या तिन्ही लोकसंचालीत साधन केंद्राच्या वार्षिक अहवाल पुस्तिकेचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतांना नीरज जागरे यांनी महिला बचत गटातील महिलांसाठी शासनाच्या विविध योजनाबद्दल मार्गदर्शन केले. शेळीपालन व्यवसायासाठी शासनाकडून ५०% सबसीडी उपलब्ध आहे. सविता बेदरकर म्हणाल्या कि, प्रत्येकाने समाजशील व्हावे, तळागाळातील लोकांना मदत करावी. महिलांनी अन्याय विरुध्द लढा द्यावा असे सांगितले. प्रतिभा परिहार म्हणाल्या कि, परिवर्तन हे जगाचे नियम आहे. त्याप्रमाणे महिलांमध्ये सुद्धा परिवर्तन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने होत आहे. महिलांची एक मोठी माळ बनविण्याचे कार्य माविम करीत आहे. सविता पुराम यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन महिलांना मार्गदर्शन केले. दिलीप वाघमारे म्हणाले कि प्रत्येक पुरुषाच्या विकासाच्या मागे एक महिलेचा प्रमुख वाटा आहे. महिलांनी सामाजिक विषमता विसरून एकात्मताने कार्य करावे. सामाजिक रूढी परंपराच्या बळी पडू नये. अर्चनाताई राऊत यांनी सावित्रीफुले जयंती निम्मित सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  सतीश मार्कंड सहायक जिल्हा समन्वय अधिकारी माविम गोंदिया, श्री राम सोनवाने,  हेमंत मेश्राम, सुरेंद्र टेंभरे , लक्ष्मी नागदेवे यांनी अथक परिश्रम घेतले. संचालन शालू साखरे तर आभार श्री इर्शाद सय्यद यांनी मानले.