▪ जिल्ह्याची नाविन्यपूर्ण योजना ▪ सर्वेक्षण पूर्ण ▪ जिल्हयात २० हजार ९० दिव्यांग ▪
▪ दिव्यांगांसाठी विशेष शिबिरातून मदत ▪
गडचिरोली,दि.04 : आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील डोंगराळ, जंगल व नदीनाल्यांनी वेढलेल्या भागात 10 लक्ष 42 हजार लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी शासनाच्या विविध विभागांनी एकत्रित येऊन केलेल्या सर्वेक्षणामध्ये एकूण 20 हजार 90 दिव्यांग व्यक्ती असल्याचे समोर आले अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड उपस्थित होते.
या सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागाने आशा मार्फत घरोघरी जाऊन दिव्यांग शोध अभियान दिनांक 2 ते 6 ऑक्टोबर या दरम्यान जिल्ह्यात राबविले. या महिन्यात 13 शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असून आरोग्य विभाग, महसूल विभाग, पंचायत विभाग, समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यामानाने तालुकास्तरीय शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर शिबिरात ALIMCO संस्थे मार्फत दिव्यांगांना आवश्यक अंगाचे मोजमाप करणे व त्या अनुषंगाने कृत्रीम हात-पाय, अंध दिव्यागांना छडी, कर्णबधीरांना कर्णयंत्र, तीनचाकी सायकल आदी साहित्य साठी नोंदणी करण्यात येणार आहे.
दिव्यांगाना शोधून त्यांना आवश्यक मदत करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. ही योजना गडचिरोली जिल्ह्यात नावीन्यपूर्ण प्रकारात राबवण्यात येत आहे. यामध्ये दिव्यांगांना आवश्यक प्रमाणपत्र वाटप, शासकीय योजनांचा लाभ व अपंगांसाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये बहुतांश भागांमध्ये शेती व वनमजुरी करून उदरनिर्वाह केला जातो. अशा परिस्थितीत घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्री काही कारणास्तव अपंग झाल्यास त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक योजना असल्या तरी प्रमाणपत्र, आधार कार्ड व इतर आवश्यक दस्तऐवज नसल्याकारणाने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यातच लोकांना आलेल्या अपंगत्वामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण झाल्याची शक्यता असते व या कारणाने ते समोर येण्यास टाळाटाळ करतात. म्हणून सर्व प्रशासनाच्या मदतीने नुकतेच सर्वेक्षण पूर्ण करून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती एकत्रित करण्यात आली.
आता प्रत्येक तालुक्यात त्यांच्यासाठी तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. यावेळी त्यांना आवश्यक प्रमाणपत्र, योजनांची माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्यात दिनांक 7 जानेवारी ते 16 जानेवारीदरम्यान 13 शिबिरांचे आयोजन सकाळी 8 वाजता ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत केले जात आहे. या शिबिराचा दिव्यांग व्यक्तीने लाभ घ्यावा असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
शिबिरांचा तपशील
दि. 7 जानेवारी – कोरची (ग्रामीण रुग्णालयात) व कुरखेडा (उपजिल्हा रुग्णालयात)
दि. 8 जानेवारी – वडसा व आरमोरी (ग्रामीण रुग्णालयात)
दि. 9 जानेवारी – धानोरा (ग्रामीण रुग्णालयात)
दि. 10 जानेवारी – चामोर्शी (ग्रामीण रुग्णालयात)
दि. 11 जानेवारी – आष्टी व मुलचेरा(ग्रामीण रुग्णालयात)
दि. 12 जानेवारी – एटापल्ली (ग्रामीण रुग्णालयात)
दि. 13 जानेवारी – अहेरी (उपजिल्हा रुग्णालयात)
दि. 14 जानेवारी – सिरोंचा(ग्रामीण रुग्णालयात)
दि. 15 जानेवारी – भामरागड (ग्रामीण रुग्णालयात)
दि. 16 जानेवारी – गडचिरोली (जिल्हा सामान्य रुग्णालयात)
या शिबारांमध्ये येताना दिव्यांग व्यक्तींनी आपल्याकडे असलेली कागदपत्रे यामध्ये आधार, अपंगात्वाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, व दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणावेत. जर काही प्रमाणपत्र काढलेलीच नसल्यास तरीही त्यांनी या शिबीरात येणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी नसलेले प्रमाणपत्र काढण्यात येणार आहे. मात्र असलेल्या प्रमाणपत्रांची झेरॉक्सप्रती सोबत आणाव्यात. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.
चौकट 1
▪ एकूण सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 10 लक्ष 42 हजार
सर्वेक्षणात आढळून आलेली परिस्थिती –
▪ अपंग असलेली लोकसंख्या 20 हजार 90
▪ यापैकी ऑनलाईन अपंग दाखला प्राप्त संख्या -2361
▪ अपंग ओळखपत्र कार्ड मिळालेली संख्या -2678
▪ पेन्शन योजना सुरू असलेली -1864
▪ घरकुल योजना लाभार्थी -3590
▪ बँकेत खाते उघडलेली संख्या -18185
▪ आधार कार्ड असलेली संख्या -17935
▪ शिधापत्रिका प्राप्त संख्या-18951
▪ शासकीय वेगवेगळ्या योजनेतून शस्त्रक्रिया झालेली लाभार्थी संख्या -678
▪ मोफत बस प्रवास कार्ड प्राप्त संख्या -1050
▪ मोफत अपंगांसाठी साहित्य मिळालेले -286
चौकट 2
▪ दिव्यांग तपशील 20 हजार 90 पैकी
E डोळ्यांनी अंध 2776
E कर्णबधिर 2829
E मूकबधिर 2082
E अस्थिव्यंग 8255
E हृदय रुग्ण 1035
E मतिमंद 1341
E सिकलसेल 919
E मानसिक आजार 489
E मिरगी 364
जिल्हाधिकारी, शेखर सिंह : “जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाकडून राबविण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्ती शोध मोहीम अभियानातून समोर आलेल्या दिव्यांगांना आता विविध विभागांकडून शिबिरां मार्फत आवश्यक मदत 100टक्के मोफत शासनाकडून दिली जाणार आहे. तसेच या सर्वेक्षणातून चुकलेले दिव्यांगांनाही या शिबारामध्ये यावे. सर्व दिव्यांग व्यक्तींना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी त्यादिवशी शिबिरांमध्ये सामील होऊन अभियानाचा लाभ घ्यावा.”
मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विजय राठोड : “तालुकास्तरीय दिव्यांग शिबिरांमध्ये सर्व विभागांनी एकत्र येऊन शिबिरांमध्ये दाखल झालेल्या दिव्यांगांना विषयानुसार मदत करून त्यांना आवश्यक प्रमाणपत्र व इतर दस्तऐवज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच जास्तीत जास्त दिव्यांग या शिबिरांमध्ये सहभागी होतील यासाठी काही दुर्गम भागात वाहतूक व्यवस्था व इतर मदत शासकीय विभागाकडून केली जाणार आहे.”
*****





