गोंदिया ,दि.31 :: जिल्हाधिकारी कार्यालयात मिशन इंद्रधनुष 2.0 तिसरी फेरी अंतर्गत जिल्हा टास्क फोर्सची सभा जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्यामसुंदर निमगडे, माता बालसंगोपन अधिकारी नितीन कापसे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष 2.0 अंतर्गत 0 ते 2 वर्षे वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या तसेच वीट भट्टयामधील, स्थलांतरीत झालेले लोक, मजूरवस्ती इत्यादी ठिकाणच्या दोन वर्षाआतील बालकांचा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यामार्फत शोध घेवून त्यांना संपूर्ण लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच याअगोदर माहे डिसेंबर 2019 व जानेवारी 2020 मध्ये सदर मोहीम राबविण्यात आलेली होती. ही मोहीम चार टप्प्यामध्ये घेण्यात येणार असून चौथी फेरी माहे मार्च 2020 मध्ये घेण्यात येईल. जिल्ह्यातील बालकांचा 100 टक्के लसीकरण करुन त्यांना सात प्रकारच्या उदा. क्षयरोग, न्युमोनिया, डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, मंदूज्वर, गोवर या आजारापासून बचाव करण्याकरीता हया लसी लावण्यात येतात.
जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सर्व विभागांना ही मोहीम यशस्वी करण्याकरीता निर्देश दिले तसेच सर्व पालकांना आपल्या बालकांचे संपूर्ण लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी लसीकरणापासून सुटलेल्या व अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांची यादी तयार करुन 100 टक्के बालकांना संपूर्ण लसीकरण करण्याचे निर्देश दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्यामसुंदर निमगडे यांनी यावेळी सांगितले की, या फेरीमध्ये गोंदिया जिल्ह्यात 88 बालके व 8 गरोदर माता यांचे अर्धवट लसीकरण झालेले असल्यामुळे किंवा लसीकरणापासून वंचित असल्यामुळे यांना नियमीत लसीकरण सत्राव्यतिरिक्त, 36 अतिरिक्त लसीकरण सत्रामध्ये लसीकरण करण्यात येईल.





