अर्जुनी मोर.,दि.12ः-हिंगणघाट येथे एका प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जीवे मारण्यात आले. त्या प्रकरणातील नराधम आरोपीला लवकर कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अंकिता पुसदे या २४ वर्षीय प्राध्यापक युवतीवर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी हिंगणघाटच्या नंदोरी चौकात घडली.गंभीर जखमी झालेल्या या युवतीची मृत्यूशी झुंज देतांना १० फेब्रुवारी रोजी पहाटे प्राणज्योत मालवली.विकेश नगराळे नामक विवाहित आरोपीने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केले.समाजमनाला सुन्न करणारी ही घटना काळिमा फासणारी आहे.बेटी बचाओ असा शासनाचा नारा देणाऱ्या समाजात मुलींची अशी अवस्था होत असेल तर शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. असे दुष्कृत्य करणाऱ्या आरोपीला लवकर कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंजू चंद्रिकापुरे,पं स सदस्य सुशीला हलमारे, मनीषा किशोर तरोणे, राधिका भेंडारकर, निशा भेंडारकर,माया बांबोळे, द्वारका गेडाम,लता वालदे, सीमा ब्राह्मणकर यांनी केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन उप विभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांना देण्यात आले. यावेळी तहसीलदार विनोद मेश्राम उपस्थित होते.





