अर्जुनी-मोर,दि.12ः- तालुक्यातील नवेगावबांध येथील बसस्थानकावरील अमोल फ्रूट सेंटरला 12 फेब्रुवारीच्या मध्यरात्री अचानक आग लागल्याने 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकान जळीत प्रकरणी घातपाताचा संशय फ्रुट सेंटरचे मालक अमोल टेंभुर्णे यांनी व्यक्त केला आहे.ते काल रात्री 8 वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते.12 फेब्रुवारी रोजी बुधवारला मध्यरात्री अचानक या दुकानाला आग लागली. शेजाऱ्यांनी धावपळ करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. रात्री दोन वाजून 15 मिनिटांनी अमोल टेंभुर्णे यांना भ्रमणध्वनीवरून दुकानाला आग लागल्याचे कळविण्यात आले. ते आपल्या दुकानात पोहोचले असता सर्व काही जळून खाक झाले होते. आग विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे याप्रकरणाची तक्रार नोंदविली आहे.नवेगावबांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार साईनाथ नाकाडे पुढील तपास करीत आहेत.





