गोंदिया,दि.15 : शहरालगतच्या मुर्री गाव शिवारातील एफसीआय गोदामच्या मागील शेतात फॉर्म हाऊसमध्ये असलेल्या इसमाची काही युवकांनी बंदुकीने गोळी झाडून हत्या केली. ही घटना काल (ता.१४) रात्री ८ वाजता सुमारासची आहे. सुरेश यादव (४८) रा.यादव चौक गोंदिया असे मृताचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच काल, रात्री ८.३० वाजता सुमारास शहरात एकच धावपळ सुटली होती. दरम्यान गोंदिया मुख्य बाजारात क्षणातच बंद झाले. या घटनेला सहा महिन्यापूर्वी नेहरू चौकात झालेल्या हत्या प्रकरणाशी जोडले जात आहे.
गोंदिया येथील सुरेश यादव हा इसम काल मुर्री गाव शिवारातील शेत शिवाराच्या फार्म हाऊसमध्ये उपस्थित होता. रात्री ७.३० वाजता सुमारास जवळपास पाच ते सहा युवक दुचाकीने फार्म हाऊसमध्ये पोहोचले. दरम्यान रचलेल्या षडयंत्रानुसार त्यातील एका युवकाने सुरेश यादव याच्यावर बंदुकीने गोळी झाडली. यामुळे सुरेश घटनास्थळीच रक्ताच्या थारोड्यात खाली पडला. तर दुसरीकडे आरोपी युवकांनी घटनास्थळावरून पोबारा केला. शेतशिवारात उपस्थित यादव यांच्या पत्नीला युवक आले आणि गेले याबाबत संशय झाला असता घटनास्थळी पोहोचताच सुरेश यादव खाली पडलेला दिसला. यावर आरडाओरड करण्यात आली. जखमी सुरेशला त्वरित जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती शहरात पसरताच एकच खळबळ उडाली. जवळपास ९ वाजता सुमारास बाजार बंद होण्याच्या मार्गावर असतानाच एका तासाआधीच गोंदिया शहरातील मुख्य बाजारपेठ बंद पडले. गोंदिया पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपासकार्याला सुरूवात केली आहे. उल्लेखनिय असे की, जुन्या वैमनस्यातून सुरेश यादव ची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे.




