चंद्रपूर,दि.28ः- देशात सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून संचारबंदी लावली आहे.तसेच बाहेरून आलेल्या प्रत्येकाला तपासणी करून 14 दिवस होम क्वॉरेंटाइन राहण्याचे सक्त आदेश असतांना काही नागरिक हे नियम पाळत नाही.एवढेच नव्हे तर खबरदारी म्हणून विदेश, तसेच दुसऱ्या राज्यातून आलेल्यांनी प्रशासनाला स्वत: माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असतांनाच येथील तुकूम परिसरातील एका मश्जिदमध्ये काही विदेशी नागरिक असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आणि शहरात एकच खळबळ उडाली.त्यात तुर्कीस्तान येथून 11, दिल्ली, ओडिसा आणि केरळ येथून आलेले प्रत्येकी 1 अशा एकूण 14 व्यक्तीचा समावेश होता. पोलिसांनी 25 मार्चला मश्जिदपरिसरात तपासणी केली असता विदेशी नागरिक वास्तव्यास असल्याचे आढळल्याने त्यांचे व्हीसा जप्त करुन कारवाई केली.तसेच विदेशातून आलेल्या 11 व्यक्तींचे तपासणीकरिता त्यांचे नमुने घेऊन विलगीकरणात पाठविण्यात आले.हे नागरिक 3 मार्चपासून याठिकाणी वास्तव्यास असल्याचे समोर आले असून प्रशासनाला ही माहिती देण्यास का टाळाटाळ करण्यात आली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.





