यवतमाळ,दि.27ः- कोरोनाच्या प्रकोपामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यांच्या सीमा प्रवासी वाहतुकीवर बंदी असतानाही तेलंगण-महाराष्ट्र सीमेवर कंटेनर व ट्रकमधून लपून प्रवास करणाऱ्या १५० जणांना यवतमाळ पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महामार्ग सातवर तेलंगण- महाराष्ट्र सीमेवर असलेल्या पिंपळखुटी चेकपोस्टवर गुरुवारी तपासणी सुरू असताना संशय आल्याने यवतमाळ पोलिसांनी एका कंटेनरची व ट्रकची तपासणी केली. यामध्ये जनावरांसारखे कोंबलेले १५०च्या जवळपास कामगार आढळून आले.
यवतमाळ जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणच्या अदिलाबाद जिल्ह्यातील हे कामगार असून ते सर्व राजस्थानमधील आहेत. कामासाठी ते आदिलाबादमध्ये आले होते देशात सर्वत्र करोनामुळे कामे बंद पडली आहेत. रेल्वे, बस वाहतूक बंद असल्याने हे कामगार अदिलाबाद जिल्ह्यात अडकून पडले होते. जीव धोक्यात घालून कंटेनर व ट्रकने राजस्थानमधील आपल्या गावी जाण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी कंटेनरच्या चालकाने त्यांच्याकडून मोठा मोबदला वसूल केला. अत्यावश्यक सामानाची वाहतूक करीत असल्याचे भासवून त्यांना बाहेर नेण्याचा चालकाचा प्रयत्न पोलिसांच्या खबरदारीने यशस्वी होऊ शकला नाही.





