७.५७ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

0
6

भंडारा दि.६: जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद गटव १0४ पंचायत समिती गणाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. ३0 जून रोजी होणारी निवडणूक ९८१ मतदान केंद्रावर घेण्यात येणार असून मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. त्यासाठी चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडणुकीत ७ लाख ५७,२५१ मतदार असल्याची माहिती जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शुक्रवारला आयोजित पत्रपरिषदेत दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ जून महिन्यात संपत आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. १0 जूनपासून हा कार्यक्रम सुरू होत आहे. ३0 जूनला मतदान होणार असून २ जुलैला मतमोजणी होणार आहे. ९८१ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून यासाठी ४ हजार ५00 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
दोन्ही निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी १,000 ईव्हीएम मशिनची आवश्यकता आहे. एका ईव्हीएम मशिनवर १२ उमेदवारांचे नाव नोंदविण्यात येणार आहेत. त्यापेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिल्यास त्याठिकाणी दोन मशिन ठेवण्यात येणार आहेत.
५0 टक्के आरक्षणामुळे महिलांना जिल्हा परिषदेच्या ५२ जागांपैकी २६ जागा तर १0४ पंचायत समितीच्या गणापैकी ५२ जागांवर निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे.