योजना जनतेपर्यंत पोहोचविणे अधिकार्‍यांचे कर्तव्य-संजय पुराम

0
19

देवरी : शासनाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रामाणीकपणे व निष्ठेने काम करायला पाहिजे. प्रत्येक विभागाचे कार्य परिणामात्मक असायला पाहिजे. सामान्य जनतेला जोपर्यंत योजना माहिती होणार नाही. तोपर्यंत जनतेचा विकास होणार नाही. याकरिता शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविने हे अधिकार्‍यांचे कर्तव्य आहे. मी अधिकार्‍यांच्या पाठीशी आहे.परंतु जे लोकांचे काम करणार नाही त्यांची गय सुध्दा केली जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
राज्य शासनाच्या आदेशान्वये व जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात लोकांच्या समस्यांच्या निवारणाकरिता येथील धुकेश्‍वरी मंदीर सभागृहात गुरूवारी (दि.४) आयोजित जनता दरबारात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सुनिल सुर्यवंशी, तहसीलदार संजय नागतीळक, प्रकल्प अधिकारी गिरीष सरोदे, सभापती कामेश्‍वर निकोडे, भाजप जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, जिल्हा परिषद सदस्य राजेश चांदेवार उपस्थित होते.
यावेळी हजारोंच्या संख्येत उपस्थित जनतेने राजस्व विभाग, कृषी विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग, सहकारी बँक, वीज विभागाच्या शेकडो तक्रारींचे पत्र आमदारांना दिले.ज्यावर आमदारांनी त्वरीत संबंधीत विभागांच्या अधिकार्‍यांना मंचावर बोलावून तक्रारीचे निवारण करण्याचे आदेश दिले. यावेळी काही विभागाच्या अधिकार्‍यांना आमदारांनी फटकार सुध्दा लावली. विशेष म्हणजे सर्वाधिक तक्रारी मनरेगाच्या होत्या. मनरेगामध्ये काम करणार्‍या मजुरांना मागील तीन वर्षापासून मजुरीच मिळाली नसल्याचे येथे उघड झाले. परंतु पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जनता दरबारात हजरच नसल्याने त्यांच्यावर कार्यवाही करून मजुरांची मजुरी त्वरीत करण्याचे आदेश आमदारांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले.