१४ गाड्यांत लागणार ‘पॅन्ट्रीकार’ : एक जनरल बोगी होणार कमी

0
6

गोंदिया दि. ८: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे झोनमधून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या १४ मोठ्या रेल्वेगाड्यांमध्ये ‘पॅन्ट्रीकार’ (स्वयंपाकगृह) नसल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. ही समस्या सोडविण्यासाठी रेल्वेने या गाड्यांमध्ये ‘पॅन्ट्रीकार’ लावण्याची योजना बनविली आहे. परंतु यासाठी एक जनरल बोगी कमी करण्यात येणार आहे, तेव्हाच ‘पॅन्ट्रीकार’ लागू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.जनरल डब्बा कायम ठेवत पॅन्ट्रीकार लावल्यास गाडीडब्याची संख्या वाढते आणि तेवढे लांब प्लटेफार्म या मार्गावर नसल्याने एक डब्बा कमी करुन पॅन्टीकार लावण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

सहा गाड्यांमध्ये ‘पॅन्ट्रीकार’ लावण्याची गरज असल्याचा झोनमधून रेल्वे बोर्डाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यानंतर रेल्वे बोर्डने झोनला याबाबत स्वतंत्रता दिली की, ‘पॅन्ट्रीकार’ लावण्यासाठी एक जनरल कोच कमी करण्यावर विचार केला जाऊ शकेल. यानंतर झोनने बिलासपूर-पुरी एक्स्प्रेसचे सर्वेक्षण सुरू केले. यात जनरल बोगींमधून रेल्वेला किती उत्पन्न मिळते, हेच पाहिले जात आहे. पर्याप्त उत्पन्न मिळत नसेल तर एक बोगी कमी करून ‘पॅन्ट्रीकार’ लावण्यात येणार आहे.

लांब पल्ल्याच्या जनरल डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. प्रवाशी दोन बर्थच्या मधोमध चादर घालून प्रवास करण्यासाठी बाध्य असतात. ज्या ट्रेनमधून एक कोच कमी करण्यात येईल, त्या ट्रेनमधील एकाच बोगीत नंतर काय हाल होतील, याची कल्पना न केलेलीच बरी.

बिलासपूर-पुणे एक्स्प्रेसमधून जनरल डबा काढून ‘पॅन्ट्रीकार’ लावण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. बिलासपूर-चेन्नई एक्स्प्रेसच्या ‘पॅन्ट्रीकार’ला या गाडीशी जोडून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे व या मार्गावर स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी एवढी नाही की ट्रेनच्या सध्याच्या लांबीत आणखी एक अतिरिक्त कोच जोडले जावू शकेल, असे तर्क त्यासाठी दिले जात आहेत. आता अधिक स्थानकांमध्ये या ट्रेनच्या जवळपास तीन बोगी प्लॅटफॉर्मच्या बाहेर असतात. त्यामुळेच एक जनरल कोच काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित गाड्यांच्या मार्गावरही हीच समस्या आहे. मात्र रेल्वे लांबी वाढविण्याचे सोडून जनरल बोगी कमी करून ‘पॅन्ट्रीकार’ जोडत आहे.