25.1 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ एका कोरोना बाधितामुळे ३७ व्यक्तींना लागण,संतरजीपुरा ठरले हाॅटस्पाॅट

एका कोरोना बाधितामुळे ३७ व्यक्तींना लागण,संतरजीपुरा ठरले हाॅटस्पाॅट

0
345

नागपूर,दि.20ः महानगरपालिका क्षेत्रातील सतरंजीपुरा हे कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरते आहे. या परिसरातील एका व्यक्तीमुळे तब्बल ३७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून, त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ही व्यक्ती १९२ व्यक्तींच्या संपर्कात आली असून, १४४ संशयितांचे अहवाल हे प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, याव्यतिरिक्त असलेल्या संशयितांचादेखील महापालिकेकडून शोध घेण्यात येत आहे. अशा कुठल्याही व्यक्तींची माहिती मिळाल्यास प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
एक व्यक्तीही मोठय़ा संख्येत कोरोनाचा प्रसार करू शकते. असाच प्रकार हा सतरंजीपुरा येथे घडला आहे. येथील एका व्यक्तीमुळे येथील संपूर्ण परिसरच धोक्यात आला आहे. कोरोनाबाधित या कुटुंबीयातील २१ जणांपैकी १५ जणांचे नमुने हे निगेटिव्ह आले आहेत. या व्यतिरिक्त ५ व्यक्तींचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. कोरोनाबाधित ही व्यक्ती लॉकडाऊनच्या काळात इतरत्र फिरल्याने धोका वाढला. हा कोरोनाबाधित व्यक्ती आजारी असताना त्याला भेटायला शेजार-पाजार तसेच नातेवाईक मंडळी भेटण्यासाठी आली होती. अशांची संख्या ही ४२ आहे. एकूणच या कोरोनाबाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात असलेल्या एकूण ८३ व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. यातील ३७ नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत. या तपासणीत ११ नमुने निगेटिव्ह आढळून आले आहेत. ही व्यक्ती दुकानदार, डॉक्टर्स, नर्स, औषधी विक्रेत्यांच्याही संपर्कात आली. अशी संपर्क संख्या १९ इतकी आहे. या सर्वांची तपासणी केल्यानंतर त्यांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. परंतु, या व्यक्तींची दुसरी चाचणी केली असता यातील एक नर्सचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. परिणामी, या दरम्यानच्या काळात हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांचा शोध घेतल्या जात आहे. दरम्यान, या व्यक्तीच्या संपर्कातील संपर्कात आलेल्या संशयितांची संख्या १९२ इतकी आहे. या व्यक्तींनी महापालिकेच्या सर्वेक्षणत आवश्यक माहिती न दिल्यामुळे उपरोक्त प्रकार घडल्याचे आयुक्तांनी सांगितले. ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग असलेले ९ परिसर सील करण्यात आले आहेत. यातील ४ परिसरांचा कालावधी १४ दिवसांचा झाला आहे. उर्वरित पाच झोनमध्ये २४ डॉक्टरांच्या नेतृत्वात २७१ पथके दररोज १९ हजार ४४३ घरांतील सर्वेक्षणातून ८३ हजार ६१ नागरिकांची विचारपूस केली जात आहे.