गोंदिया,दि.२७ : गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या उपचारासाठी शासन कितीही प्रयत्न करीत असले तरी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा अद्यापही कायम आहे. त्यातच संपूर्ण देशात कोरोना विषाणू संसर्गाचा आजार थांबविण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असल्याने इतर रुग्णांच्या आरोग्य सोयी-सुविधाकडे अनेक रुग्ण प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच प्रसूतीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाई गंगाबाई रुग्णालयाची व्यथा अजुनही संपलेली नाही.आज सोमवारला(दि.२७)ज्यापध्दतीने मोठ्यासंख्येने महिला महिला रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये एकत्र आल्या,त्याकडे बघितल्यास त्या रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षकांसह तेथील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांचे किती प्रामाणिक लक्ष आपल्या कर्तव्याकडे आहे याचा भोंगळ कारभारच चव्हाट्यावर आला आहे. एकंदरीत येथील आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष सुध्दा येथील व्यवस्था बिघडण्यास कारणीभूत ठरू लागली आहे.जिल्ह्याच्या प्रमुख असलेल्या जिल्हाधिकारी मॅडम व जिल्हा परिषदेचे प्रमुख असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी हे वैद्यकिय क्षेत्रातून आलेले असतानाही त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आरोग्याच्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी होत्या,त्या पुर्ण होऊ शकल्या नाही.त्यामुळे या बाई गंगाबाई रुग्णालयातील समस्या दिवसेंदिवस जठिल होत चालली असून सेवेसाठी या रुग्णालयाची आरोग्य सेवा पुन्हा रुसल्याचे चित्र वैद्यकिय अधिकार्यांच्या वेळेवरील अनुपस्थितीमुळे रुग्णालयात बघावयास मिळाले.
जिल्ह्यात एकमेव असलेला बाई गंगाबाई रुग्णालयाचा कारभार अनेक वेळा यापूर्वीही चव्हाट्यावर आला आहे. बालमृत्यू तसेच माता मृत्यूने हा रुग्णालय अनेक वेळा चर्चेत आला आहे. तर सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी यंत्रणा कामी लागली असल्याने या संधीचा लाभ घेत या रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला आहे. प्रशासनाचे संपूर्ण लक्ष संसर्ग थांबविण्यावर असले तरी इतर आजारांच्या रुग्णांची मात्र या काळात चांगलीच गैरसोय होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण तपासणी केंद्र आहे. तर दुसरीकडे अनेक खाजगी डॉक्टरांचे दवाखाने बंद आहे. अशा वेळी कोरोना व्यतिरिक्त रुग्णांनी कुणाचा आसरा घ्यावा, ही समस्या जिल्ह्यात निर्माण झाली आहे. पूर्वीच जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचा विचार केल्यास वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता त्यातील एक प्रमुख कारण आहे. मात्र महिन्या भराच्या लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अनेक आरोग्य सेवा संस्थांच्या समस्या उजागर झाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून प्रसूतीसाठी येणार्या महिलांची बाई गंगाबाई रुग्णालयात वेळेवर तपासणी होत नसल्याचेही समोर आले आहे. आज (दि.२७) ओपीडी सेवा नियमानुसार ८ वाजता सुरू व्हायला पाहिजे होती. परंतु ११ वाजेनंतरही ही सेवा सुरू झाली नव्हती. त्यामुळे अनेक गरोदर मातासह तपासणीसाठी आलेल्या महिलांना रुग्णालयाच्या वर्हांड्यातच बसावे लागले.त्यातही सध्या शासन सोशल डिस्टंसिंगवर भर देत असतांना या रुग्णालयात ज्या पध्दतीने महिलांची गर्दी बघावयास मिळाली,त्यावरुन कुठेच सोशल डिस्टसिंग पाळले न गेल्याने रुग्णालयातील कर्मचारी अधिकारी यांचे लक्ष कुठे असते हा सुध्दा प्रश्न निर्माण झालेला आहे.काही दिवसापुर्वीच याच रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकार्यांना रक्तदानाच्यावेळी सोशल डिस्टसिंगचा भान न ठेवल्याने जिल्हाधिकारी महोदयांनी फटकारले होते.
गरोदर व स्तनदा मातांची गैरसोय
ग्रामीण भागातील असलेली आरोग्य सेवा ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय यामध्ये संसाधनाचा अभाव असल्याने गरोदर मातांना रेफर टु गोंदिया अथवा नागपूर करण्यात येते. यामुळे येथील बाई गंगाबाई रुग्णालयात गरोदर मातांची नेहमी प्रसूतीसाठी वर्दळ असते. विशेष म्हणजे या रुग्णालयात पूर्वीच वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता तसेच रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे बालमृत्यू व माता मृत्यूचे प्रमाण अनेक वेळा अनुभवास आले आहेत. त्यातच माली महिन्या भर्यापासून संचारबंदी असल्याने पूर्ते या रुग्णालयाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा फटका आता गरोदर व स्तनदा मातांना बसू लागला आहे. त्याचा अनुभव ही आज रुग्णालयात बघावयास मिळाला.
वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पद भरतीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
आरोग्य व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी आरोग्य परिचारीका व अधिपरिचारिका यांची भरती व्हावी, यासाठी एकदा सोडून दोनजा जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्यावतीने काढण्यात आली. मात्र याकडेही जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. त्यातच वैद्यकीय अधिकार्यांचीही कमतरता आहे. सद्या संचारबंदीच्या काळात आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणूच्या संसर्ग थांबविण्यासाठी कामात असल्याने सर्वसामान्य प्रकारच्या आजारी व्यक्तींच्या उपचाराकडे यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा फटकाही आता बसू लागला आहे. तेव्हा बाई गंगाबाई रुग्णालयातील समस्यांची दखल घेऊन त्वरीत पदभरती करून होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.एकीकडे नक्षलग्रस्त आदिवासी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लाकडाऊनच्या काळात वैद्यकिय अधिकार्यांची पदे आनलाईन मुलाखतीतून भरु शकतात,तर गोंदियाच्या जिल्हाप्रशासनाला हे का जमत नाही हा सुध्दा प्रश्न उपस्थित झालेला आहे.





