ऑनलाईन नामांकनाने सर्वांचीच तारांबळ

0
9

गोंदिया दि.१२: जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना बुधवारी (दि.१0) जारी झाली. मात्र यावेळी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने नामांकन भरायचे असल्याने ग्रामीणच नाही तर शहरी भागातही उमेदवारांची तारांबळ उडत आहे. दुसरीकडे निवडणूक विभागाकडून यासंदर्भात योग्य ती माहिती पुरविली जात नसल्याचा आरोप करीत विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
येत्या ३0 जून रोजी मतदान असल्याने या निवडणुकीसाठी मतदारांपर्यंत पोहोचण्यास उमेदवारांकडे अतिशय कमी कालावधी आहे. त्यातच काही प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अजूनही निश्‍चित झालेले नाही. ५0 टक्के महिला आरक्षणामुळे आणि राखीव गटातील उमेदवार वाढल्याने त्यांची निवड करताना पक्षाच्या पदाधिकार्‍यांना थोडा वेळ लागत आहे. मात्र गुरूवारी बहुतांश राजकीय पक्षांच्या उमेदवारांची यादी निश्‍चित झाली होती. आता नामांकन दाखल करण्यासाठी फक्त चारच दिवस उरले असल्याने शुक्रवारपासून नामांकन दाखल करण्यासाठी एकच धांदल उडणार आहे.
आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे जाऊन नामांकन दाखल करावे लागत होते. मात्र आता पहिल्यांदाच ऑनलाईन प्रणालीने इंटरनेटच्या सहाय्याने संगणकावर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज भरायचा आहे. बुधवारी निवडणुकीची अधिसूचना जारी करताना हा ऑनलाईन नामांकन फॉर्म नेमका कसा आहे, तो कसा भरायचा, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार याची माहिती तालुका स्तरावर उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र अनेक ठिकाणी ही माहिती पोहोचलीच नव्हती. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान गुरूवारी ही माहिती तालुकास्तरावर पोहोचविण्यात आली. मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे आणि काही ठिकाणी ती साईटच उघडत नसल्यामुळे दुसर्‍या दिवशीसुद्धा एकही नामांकन दाखल होऊ शकले नाही.