संकल्प स्वच्छतेचा मनपा व नगरपालिकांची एक दिवसीय कार्यशाळा

0
18

नागपूर, दि. ११ : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान(नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरु झाली असून या अभियानाचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर विभागातील सर्व महानगरपालिकांचे महापौर व आयुक्त आणि नगरपालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची एक दिवसाची कार्यशाळा व त्यानंतर ‘नागपूर विभागाचा, संकल्प स्वच्छतेचाङ्क या कार्यक्रमाचे आयोजन १२ जून रोजी सकाळी ९.३० ते ४.३० या दरम्यान चिटणवीस सेंटर येथे करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेत कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दुपारी ३ ते ४.१५ यावेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार असून उपस्थित महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त आणि मुख्याधिकारी यांना मुख्यमंत्री स्वच्छतेचा संकल्प देणार आहेत.
शहरे स्वच्छ व्हावीत, कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाट कशी लावता येईल, शौचालयाचा १०० टक्के वापर करता येईल, कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रकिया कशी करता येईल, सांडपाण्यावर प्रकिया करणे कसे आवश्यक आहे, स्वच्छ व हरित महाराष्ट्र कसा साकारता येईल, व्यापक लोकसहभाग कसा मिळवता येईल आणि सहभागाचा ठाम निर्धार ही संकल्पना कशी रुजवता येईल, या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या ‘सप्तपदी स्वच्छतेचीङ्क ही अभिनव संकल्पना पुढे आली आहे.
कोणत्याही गोष्टीचा ध्यास असल्याशिवाय ती गोष्ट साध्य होत नाही. स्वच्छता अभियान यशस्वि तेसाठी लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थांचे २०१५ पर्यंत राज्यातील किमान ५० शहरे शंभर टक्के हागणदारीमुक्त होतील, असा विश्वास नगरविकास विभागाच्या सचिव आणि अभियानाच्या नोडल सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी व्यक्त केला आहे. कार्यशाळेत नगरपालिका प्रशासनाच्या संचालक व आयुक्त श्रीमती मीता राजीव लोचन यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध शास्त्रोक्त पद्धतीविषयी माहिती देण्यात येणार आहे.
२०११ च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या ५ कोटी ८ लाख २७ हजार आहे. एकूण लोकसंख्येच्या ४५.२३ टक्के लोकसंख्या ही नागरी आहे.
राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांमधून साधारण २० हजार मेट्रीक टन घनकचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाटसुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने होणे आवश्यक आहे. या कार्यशाळेतून निश्चितच सकारात्मक बाब पुढे येईल.