त्रिपुरा विद्यापीठाच्या धर्तीवर गोंडवाना विद्यापीठात बांबू अभ्यासक्रम

0
17

चंद्रपूर दि. १२-: चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्रात उत्तम दर्जाच्या वस्तू निर्माण व्हाव्या यासाठी त्रिपुरा विद्यापीठाच्या धर्तीवर गोंडवाना विद्यापीठात बांबू अभ्यासक्रम सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. बांबू धोरणात सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करावी अशा सूचनाही त्यांनी सचिवांना दिल्या. वनराजिक महाविद्यालयात वनविभागाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला वनविभागाचे सचिव विकास खारगे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. एस. के. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्रात शास्त्रोक्त पद्धतीने वस्तू तयार करता याव्या यासाठी गोंडवाना विद्यापीठात बांबू अभ्यासक्रम सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यासाठी गोंडवाना विद्यापिठाच्या कुलगुरु सोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. रोप तयार करणे, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे, जलस्त्रोताची माहिती घेणे, वनविभागाचे विश्रामगृह दुरुस्ती व नवीन बांधकाम करणे, वनस्पती उद्यान नियोजन, बांबू प्रशिक्षण केंद्र, जनवन योजना, गॅस पुरवठा, बांबू प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित झालेल्या मुलांना बाजारपेठ उपलब्ध करुण देणे व इतर बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला. जिल्ह्यात असलेल्या 2641 कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या दूतर्फा झाड लावण्याचा उपक्रम सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या सगळ्या विषयाचा आढावा घेण्यासाठी दर दोन महिन्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल.

बांबू धोरणात सुधारणा सुचविण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी सचिवाना दिल्या. चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्राची कार्यपद्धती व रचना ही समिती ठरवेल असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, ही समिती देशाच्या इतर भागातील बांबुचा अभ्यास करेल व काय नवीन करता येईल ते सुचवेल. बांबूच्या वस्तुंना बाजारपेठ, विपणन व्यवस्था, शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून बांबुचा उपयोग याबाबत ही समिती मार्गदर्शन करेल.

वनस्पती उद्यान हे देशातील अन्य उद्यानाचा अभ्यास करून तयार करण्यात यावे. या उद्यानात वनस्पती शास्त्राचा अभ्यास व्हावा. वनस्पती उद्यान हे पर्यटन, मनोरंजन व अभ्यास केंद्र व्हावे अशी अपेक्षा पालकमंत्री यांनी व्यक्त केली. 29 जुलै हा वाघ संवर्धन दिवस म्हणून पाळण्यात यावा असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

वनविभागाच्या योजना व नियोजन या बाबत संजय ठाकरे यांनी सादरीकरण केले. बांबू हस्तकला या विषयावर डॉ. अभिनव कांत तर आदित्य जोशी यांनी ताडोबाचे आधुनिक पद्धतीने सर्व्हेक्षण यावर सादरीकरण केले.