बंद उद्योग पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करणार – पालकमंत्री मुनगंटीवार

0
13

चंद्रपूर दि. १२-: ‘मेक इन चंद्रपूर’साठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून एमआयडीसीमधील उद्योग पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. एमआयडीसी इंडस्ट्रीयल अशोसिएशन चंद्रपूरच्या वतीने आयोजित ‘मेक इन चंद्रपूर’ या उद्योजकांच्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. मुनगंटीवार बोलत होते.

परिषदेचे उद्घाटक म्हणून उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि विशेष अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर उपस्थित होते. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, आमदार शोभाताई फडणवीस, नाना शामकुळे, ॲड.संजय धोटे, वनविभागाचे सचिव विकास खारगे, उद्योग विकास आयुक्त व सचिव डॉ.सुरेंद्रकुमार बागडे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, डब्ल्युसिएलचे अध्यक्ष आर.आर.मिश्र, प्रादेशिक अधिकारी जे.बी.संगीतराव, उद्योग सहसंचालक विकास जैन व अतिरिक्त मुख्य अभियंता एस.आर.वाघ व असोशिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, चंद्रपूर औद्योगिक वसाहतीतील बंद उद्योग पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करणार असून या माध्यमातून उद्योगांना चालना दिल्या जाईल. औद्योगिक वसाहतीतील प्लॉट घेतल्यानंतर उद्योग सुरु न करणाऱ्या व्यक्तींकडून प्लॉट परत घेण्याची कारवाई शासन करत असून ते गरजूंना देण्यात येतील. ही प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे.

यावेळी विविध उद्योगपतींनी आपल्या समस्या मांडल्या. उद्योजकांनी यावेळी उद्योगांना वीज स्वस्तात मिळावी, एमआयडीसीत प्लॉट मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, विविध परवानग्या अभावी प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली निघावे, प्रदूषण विभागाचे क्लिअरन्स जलद गतीने मिळावे, राईस मिलला सवलती मिळाव्यात, सिमेंट किंमतीबाबत धोरण असावे, नवीन उद्योग धोरण शेतीवर आधारित असावे, विदर्भामध्ये उद्योग परिषद व्हावी, नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यासाठी विशेष उद्योग धोरण असावे, स्टोन व्हेअर पाईप नगर परिषदेला खरेदी करण्यासाठी सुचवावे आदी मागण्या सुधीर मुनगंटीवार व प्रवीण पोटे यांच्याकडे केल्या.

या सर्व मागण्यांवर गांभिर्याने विचार करणार असून उद्योगांना सवलती व पाठिंबा देण्यासाठी शासन तत्पर राहिल, असे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मामा तलावाच्या दुरुस्तीसाठी अर्थंसंकल्पात 100 कोटी तरतूद केली असून जिल्ह्यातील प्रलंबित वीज जोडण्या डिसेंबर 2015 पर्यंत पूर्ण होतील. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल असेही श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

प्रवीण पोटे म्हणाले, ‘मेक इन इंडिया’ व ‘मेक इन महाराष्ट्रा’च्या धर्तीवर सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने सुरु असलेल्या ‘मेक इन चंद्रपूर’साठी उद्योग मंत्रालय चंद्रपूरातील बंद उद्योग नव्याने सुरु करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्लॉट उद्योजकांना 3 महिन्यात हस्तांतरण करण्याचे शासनाचे धोरण आहे. उद्योगासंबंधी अडचणी व समस्या असल्यास आपल्याशी थेट संपर्क साधावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक भाषण मधुसूदन रुंगठा यांनी केले.