नगराध्यक्षांचा गंभीर आरोप ,मुख्याधिकार्‍यांनीच मागितले कमीशन!

0
17

गोंदिया दि.१३: सध्या गाजत असलेल्या गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी व पदाधिकार्‍यांच्या वादात आता नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी उडी घेत मुख्याधिकारी मोरे हेच कामांचे कमिशन मागत असल्याचा गंभीर आरोप पत्रपरिषदेत केला.यावेळी नगर परिषदेचे गटनेता दिनेश दादरीवाल, नगरसेवक शिव शर्मा, घनश्याम पानतवने हेसुद्धा उपस्थित होते.दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाबद्दल आपली बाजू मांडताना नगराध्यक्ष जयस्वाल म्हणाले, मुख्याधिकारी मोरे यांना आपण सकाळी १0 वाजता आमसभेची तारीख निश्‍चित करण्यासाठी बोलविले होते. ते अध्र्या तासात पोहोचतो असे वारंवार सांगत होते. मात्र प्रत्यक्षात दुपारी ३ वाजता पोहोचले. एवढेच नाही तर आपल्यावर ते भडकले आणि मी कोणाच्या बापाचा नोकर नाही, अशा शब्दात त्यांनी सुनावले, असे जयस्वाल यांनी पत्रकारांना सांगितले.
नगरसेवकांकडून आलेले प्रस्ताव आमसभेत ठेवण्याबद्दल त्यांना सांगितले असता मुख्याधिकार्‍यांनी भडकून आमसभेत प्रस्ताव ठेवण्याच्या बदल्यात पैशाची मागणी केल्याचा आरोप जयस्वाल यांनी केला.
यावेळी जयस्वाल यांच्यासह स्वीकृत नगरसेवक शिव शर्मा हेसुद्धा उपस्थित होते. त्यांनी या कथित मारहाणीबद्दल बोलताना सांगितले की, मुख्याधिकार्‍यांवर झालेला हा हल्ला हा प्रत्यक्ष झालेलाच नसून ही सर्व रचलेली कहाणी असल्याचे ते म्हणाले. वास्तविक भाजपला बदनाम करण्यासाठी रचलेले हे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले.
रामनगर पोलिसांनीही याप्रकरणी पक्षपातीपणा केल्याचा आरोप जयस्वाल व शर्मा यांनी लावला. मुख्याधिकार्‍यांच्या तक्रारीवरून शिव शर्मा यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी जातात. मात्र नगराध्यक्षांच्या तक्रारीवरून कोणताही गुन्हा दाखल केला जात नाही.या प्रकाराची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडेही करण्यात आली असल्याचे यावेळी दादरीवाल यांनी सांगितले. कर्मचार्‍यांना आंदोलन करण्यासाठी मुख्याधिकार्‍यांनीच भडकावले असाही आरोप त्यांनी केला.