26.9 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ केश कर्तनालये,सलून, ब्युटी पार्लर,टॅक्सी कॅब ऑटोसह विविध खाजगी कार्यालये व आस्थापना सुरू...

केश कर्तनालये,सलून, ब्युटी पार्लर,टॅक्सी कॅब ऑटोसह विविध खाजगी कार्यालये व आस्थापना सुरू होणार

वेळेचेही बंधन असणार ग्राहकांची नोंद घेणे आवश्यक मास्कचा वापर करणे अनिवार्य इ-पेमेंट व्यवहारास प्रोत्साहन आरोग्य सेतू अँप्स डाउनलोड करणे बंधनकारक

0
321

गोंदिया दि.10ः जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी एका आदेशाद्वारे जिल्ह्यातील सर्व खासगी कार्यालये, केश कर्तनालये,सलून, ब्युटी पार्लर,टॅक्सी कॅब ऑटो/ रिक्षा व सायकल रिक्षांना तसेच उपहारगृहे,हॉटेल्स,रेस्टॉरंट व ज्यूस सेंटर यांना अटी व शर्तीवर आणि वेळेचे बंधन घालून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालयांमध्ये व त्या कार्यालयाच्या परिसरात शारीरिक अंतराचे पालन करणे,सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे, कार्यालयाबाहेर हॅन्ड वॉश स्टेशन व सेनीटायझर उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.कार्यालय व परिसर वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेतू ॲप्स डाऊनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सर्व केस कर्तनालये,सलून व ब्युटी पार्लर सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजता दरम्यानच्या कालावधीत सुरू असतील. शारीरिक अंतर ठेवणे ,वापरात येणारे सर्व साहित्य व इतर बाबी प्रत्येक वापरानंतर निर्जंतुक करणे, आस्थापनाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी देखील प्रत्येक ग्राहकाला सेवा देण्यापूर्वी देण्यापूर्वी व सेवा दिल्यानंतर हात धुणे, सर्वांनी मास्कचा वापर करणे ,बाहेर हॅन्ड वॉश स्टेशन,सॅनिटायझर उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. दुकानाच्या आत गर्दी होणार नाही याची जबाबदारी दुकानदाराची असेल.गर्दी रोखण्यासाठी बाहेर खुणा करणे तसेच टोकन पद्धतीचा वापर करणे आवश्‍यक आहे.दोन खुर्च्यामध्ये पुरेसे अंतर ठेवावे.केशकर्तनालयात एक ग्राहकास वापरण्यात आलेले कापड ,टॉवेल व रुमाल इत्यादीचा पुन्हा वापर करू नये.शक्यतोवर ग्राहकाने स्वतःची टॉवेल, कापड व रुमाल सोबत आणावे. ग्राहकाचे नाव, संपर्क क्रमांक व पत्ता नोंदविण्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. ती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनाधारकाची असेल.

जिल्ह्यांतर्गत टॅक्सी/कॅब व ऑटोरिक्षा/ सायकल रिक्षा यांना तसेच दुचाकी वाहनावर फक्त चालकास प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.टॅक्सी /कॅबमध्ये एक चालक व दोन प्रवासी आणि ऑटो रिक्षा व सायकल रिक्षामध्ये एक चालक व एक प्रवासी यांना शारीरिक अंतर पाळून प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली आहे. टॅक्सी/कॅब/ ऑटोरिक्षा व सायकल रिक्षा चालकांनी व सर्व प्रवाशांनी मास्क वापरणे, संबंधित चालकांनी वाहन वेळोवेळी निर्जंतुक करणे बंधनकारक आहे.ज्या प्रवाशांना सेवा देण्यात येत आहे त्या सर्व ग्राहकांची नोंद घेण्यासाठी संबंधित वाहनचालकाने नोंदवही ठेवणे आवश्यक आहे. त्या सर्व प्रवाशांचे नाव ,संपर्क क्रमांक व पत्ता यांचा तपशील नोंदवहीत नोंदवून तो वेळोवेळी अद्यावत करून ठेवावा लागेल.

उपाहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट व ज्यूस सेंटर या आस्थापनामधून पार्सल सुविधा, घरपोच सुविधा देण्यास परवानगी देण्यात आली आहे.परंतु बैठक व्यवस्थेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ सेवनास या आस्थापनामध्ये बंदी करण्यात आली आहे. ग्राहक हा खाद्यपदार्थ खरेदी करू शकेल व घरपोच सुविधा असेल पण त्या आस्थापनांमध्ये खाद्यपदार्थ खाण्यास मनाई करण्यात आली आहे. शारीरिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. या आस्थापनाच्या बाहेर ग्राहकांना शारीरिक अंतर राखण्यासाठी खुणा कराव्यात.आस्थापनातील सर्व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी हात धुणे आवश्यक आहे.सर्वांनी तेथे मास्कचा वापर करणे तसेच स्थापनेच्या बाहेर हॅन्ड वॉश स्टेशन व सॅनीटायझर उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.ई-कॉमर्स व कुरियर द्वारे वस्तूंची घरपोच सुविधा सुरू राहील.

वरील सर्व आस्थापना अथवा सेवा देणाऱ्या इतर व्यावसायिकांकडे जर सर्दी, खोकला,ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्याची लक्षणे असलेला एखादा ग्राहक आल्यास त्या ग्राहकाला सेवा पुरवण्यात येऊ नये व संबंधित ग्राहकास जवळच्या सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला द्यावा.वरील सर्व आस्थापनांमध्ये शक्यतो ई-पेमेंट व्यवहार करण्यास प्राधान्य द्यावे. कमीतकमी रोखीने व्यवहार करावे. आस्थापना व वाहतुकीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची सर्व आस्थापना चालकांनी दक्षता घ्यावी. सर्व खाजगी कार्यालय प्रमुख, कर्मचारी, आस्थापनाधारक व वाहनचालक यांनी आरोग्य सेतू ॲप्स डाउनलोड करावा. दहा वर्षाच्या आतील व ६५ वर्षावरील व्यक्ती,गरोदर महिला आणि इतर आजारांची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी अत्यावश्यक बाबी वगळता घराबाहेर पडू नये. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेवर कलम १८८ अन्वये कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आदेशात म्हटले आहे आहे.