गडचिरोली,(जिमाका)दि.20: गडचिरोली जिल्ह्यात आज 2 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आले असून आता जिल्ह्यात कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या एकूण 8 झालेली आहे. सदर कोरोनाबाधित रुग्ण हे जिल्ह्याबाहेरुन गडचिरोली जिल्ह्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, प्राधिकरण गडचिरोली यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पुढील क्षेत्रांना कन्टेनमेंट झोन घोषित करुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.आरमोरी तालुक्यातील शंकरनगर (संपूर्ण गाव) या क्षेत्राचे आरमोरीचे तहसिलदार हे कन्टेनमेंट झोनचे नियंत्रक अधिकारी असतील. तर तालुका चामोर्शी येथील श्यामनगर, मंडळ घोट (संपूर्ण गाव) चामोर्शीचे तहसिलदार हे कन्टेनमेंट झोनचे नियंत्रक अधिकारी असतील.
सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी विलगीकरण कक्षामध्ये बाहेरुन आलेल्या लोकांना ठेवण्यात आलेले आहे. संशयीत रुग्णांचे कोविड-19 अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तथापि महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये कोरोना साथरोग संदर्भाने रेड झोन/ ऑरेंज झोन/ग्रीन झोन/कन्टेनमेंट झोन वर्गीकृत करुन घोषित करण्याबाबत जिल्हा प्रशासनास मुभा देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात यापूर्वी कन्टेनमेंट झोन वर्गीकृत करुन घोषित करण्यात आले आहे. तथापि काल व आज गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, कुरखेडा व चामोर्शी तालुक्यात एकूण 3 अतिरिक्त कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत.
वरील दर्शविलेल्या सदर क्षेत्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांनी दिलेल्या आदेशान्वये सुट दिलेल्या प्रवास/आस्थापना/दुकाने/सेवा इत्यादी बाबी पूर्णत: प्रतिबंधित असतील.सदर भागात वैद्यकीय सेवेशी संबंधित अधिकृत अधिकारी/कर्मचारी यांना प्रवेश अनुज्ञेय असेल.तसेच दर्शविलेल्या सदर भागातअन्नधान्य/ भोजन/विलगीकरण कक्षाशी संबधित संसाधने यांचेशी संबंधित व्यक्तींना तहसिलदार यांचे पुर्वपरवानगीने अनुज्ञेय असेल.याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला वा वाहनाला वा साधनाला उक्त क्षेत्रात ये-जा करण्यास मनाई असेल.उक्त दर्शविलेल्या सदर क्षेत्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे आदेश अन्वये दंडात्मक कारवाई बाबतचे निर्देश सदर भागात पूर्णत: लागू असतील.
सदरील आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसचे भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला यांनी कळविले आहे.




