26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ सव्वा दोन लाख क्विंटल धान महामंडळाचे उघड्यावर

सव्वा दोन लाख क्विंटल धान महामंडळाचे उघड्यावर

0
140

देवरी,दि.0५ : आदिवासी विकास महामंडळातंर्गत पूर्व विदर्भातील नागपूर,भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची अद्यापही उचल न करण्यात आल्याने २ लाख २५ हजार क्विंटल धान तिन्ही जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर उघड्यावर पडला आहे. धान साठवून ठेवण्यासाठी गोदामांची व्यवस्था नसल्याने दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र याची अद्यापही शासनाने दखल घेतली नाही.शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाकडून शासकिय धान खरेदी केंद्र सुरू करुन धान खरेदी केली जाते. आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी आदिवासी विकास महामंडळातंर्गत या तिन्ही जिल्ह्यात धान ५० धान खरेदी केंद्र सुरु केले जातात. खरीप आणि रब्बी हंगामात हमीभावाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना कमी दराने धान खासगी व्यापाºयांना विक्री करण्याची वेळ येत नाही. यंदा रब्बी हंगामात आदिवासी विकास महामंडळाने ४ जून पर्यंत एकूण २ लाख २५ हजार धान खरेदी केली आहे. मात्र खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी महामंडळाकडे अद्यापही गोदामांची व्यवस्था नसल्याने हा सर्व लाखो क्विंटल धान तसाच उघड्यावर ताडपत्र्या झाकून ठेवला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात आलेल्या वादळी पावसामुळे केंद्रावरील धान भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. दरवर्षी उघड्यावरील धान खराब होवू लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.