28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ मान्सून पुर्व तयारीची एसडीआरएफने केली शोध व बचाव कार्याची रंगीत तालिम

मान्सून पुर्व तयारीची एसडीआरएफने केली शोध व बचाव कार्याची रंगीत तालिम

पूर परिस्थिती आणि कोरोनावर मात करण्यासाठी जनजागृती व दक्षता हे महत्वाची शस्त्रे- जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे

0
222

गोंदिया दि.6 (जिमाका)-आपत्ती ही कधी सांगून येत नाही.आपत्तीचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुर्व नियोजन करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण व जनजागृती हे आपत्ती व्यवस्थापनातील दोन बाजू आहेत. आपत्तीच्या काळात जनजागृती व दक्षता या शस्त्रांचा वापर करुन पुर परिस्थिती आणि कोरोनावर मात करता येईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात 4 जून रोजी आयोजित पुर परिस्थतीत शोध व बचावकार्य प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ.बलकवडे बोलत होत्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले,प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, राज्य आपत्ती दल, नागपूर तुकडी क्र. 1 चे टिम कमांडर प्र. सहायक समादेश सुरेश कराळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस उपनिरीक्षक अजय काळसरपे,गोंदिया तहसिलदार राजेश भांडारकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर, जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख किशोर टेंभुर्णे प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ बलकवडे म्हणाल्या की, यावर्षी जिल्हा प्रशासनासमोर कोरोना आजार तसेच पुर परिस्थिती असे दोन महत्वाचे आव्हान आहेत. या दोन्ही समस्याना तोंड देण्यासाठी सर्व विभागातील तसेच प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी दक्षता घेऊन कार्य करावे. शोध व बचाव कामात जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून देण्यात आलेल्या प्रात्यक्षिकाच्या रंगीत तालिमेचा वापर पुढील काळात येणाऱ्या आपत्तीवर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. या वर्षी जिल्हयातील जलाशये, धरणे व इतर ठिकाणी पाण्याचा साठा मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुर परिस्थीतीचे सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मध्यप्रदेशातून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगून डॉ.बलकवडे म्हणाल्या,जिल्ह्यातील नदीकाठावर असलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणे गरजेचे आहे. त्याकरिता नियुक्त केलेल्या क्षेत्र अधिकाऱ्यांनी मुख्यालयात राहून पुर परिस्थीतीची माहिती तात्काळ वरिष्ठांना देणे आवश्यक आहे आपत्तीच्या वेळेस नागरिकांमध्ये प्रशिक्षण व जनजागृतीची माहिती नसल्यामुळे आपत्ती काळात नुकसानीचे प्रमाण वाढते. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन जनजागृती केल्यास त्याचे प्रतिसाद समाजापुढे येतील व पुर परिस्थीतीत जिवीत व वित्तीय हानि कमी करण्यास मदत होईल. कोरोनावर प्रशासन आणि नागरिकांनी मिळून मात करणे शक्य होईल. समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करुन दक्षता घेणे महत्वाचे आहे.असे त्यांनी सांगितले.

श्री. कराळे म्हणाले की, सजग नागरिक हा सुरक्षित नागरिक असतो असे सांगून त्यांनी पुराचे प्रकार, पुर येण्याची कारणे, धरणातून पाणी सोडण्याची पुर्व सूचना, हवामान खात्याचे अंदाज इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली. शोध व बचाव कार्य करतांना घेण्यात येणाऱ्या आवश्यक दक्षतेच्या संदर्भात अनुभव सांगितले. तसेच घरगुती टाकाऊ वस्तुपासून फ्लोटींग डिव्हाईस तयार करुन प्रात्यक्षिके दाखविले.

प्रशिक्षण कार्यक्रम संपल्यावर गोंदिया तालुक्यातील खडबंदा जलाशय येथे उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थ्याना रंगीत तालिमेतून प्रशिक्षण देण्यात आले.खडबंदा जलाशयातील पाण्यात रबर बोट व इंजिनचे प्रशिक्षण,शोध व बचाव करतांना पाण्यात बुडालेल्या व्यकतीचा शोध घेणे,पाण्याच्या प्रवाहात बोटीचे प्रयोग आदीचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्ह्यात पुर परिस्थितीमध्ये कार्य करणारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे शोध व बचाव दल, अग्निशमन विभागातील अधिकारी छबीलाल पटले व कर्मचारी, तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य आशीष चौहान, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन शाखेतील दिपक परिहार, महेश वंजारी, यादव फरकुंडे आदि या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होते.