गोंदिया,दि.१६-:’निसर्ग’ चक्रीवादळाच्या थैमानाने विस्कळीत झालेली महावितरण यंत्रणा पुर्ववत करण्याच्या कामाला गती देण्यासाठी महावितरण गोंदिया परिमंडळातील गोंदिया व भंडारा मंडल कार्यालयाचे पथक रवाना करण्यात आले आहे.निसर्ग चक्रीवादळ या अस्मानी संकटाचा सर्वाधीक फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. यात हजारो वीज खांब ,रोहीत्रे आणि शेकडो किमीच्या वीज वाहीन्या कोलमडल्या आहे. त्यामुळे अनेक गावे अजूनही अंधारातच आहे. विस्कळीत झालेली महावितरणची यंत्रणा पुर्ववत करण्यासाठी युध्दस्तरावर प्रयत्न सुरू असले तरी दुरूस्तीच्या कामाला गती देण्यासाठी माननीय ऊर्जामंत्री श्री. नितीन राऊत यांनी मणुष्यबळ वाढविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्याचे प्रधान ऊर्जा सचिव तथा महावितरणचे अधक्ष्य व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या आदेशानुसार संचालक (संचालन)दिनेशचंद्र साबू यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांनी आदेश देऊन अधिक्षक अभियंते राजेश नाईक, सम्राट वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही मंडळाचे पथक रायगडसाठी पाठविले.पुढील काही दिवस हे कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामात मदत करणार आहेत.
गोंदिया व भंडारा मंडळाच्या पथकात २ अभियंते व ४९ जनमित्र असे एकून ५१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रायगडला रवाना होण्यापुर्वी गोंदिया मंडळातील पथकाला मुख्य अभियंता सुखदेव शेरकर व अधिक्षक अभियंता सम्राट वाघमारे यांनी तसेच भंडारा मंडळातील पथकाला अधिक्षक अभियंता राजेश नाईक यांनी विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करताना विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळण्याबाबत आवशक सुचना केल्या.पथकात सहभागी कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर ,मास्क व आर्सेनिक अल्बम -३० चे वाटप करण्यात आले. गोंदिया मंडळातील पथकाला रवाना करतेवेळी मुख्य अभियंता सुखदेव शेरकर, अधिक्षक अभियंता सम्राट वाघमारे, कार्यकारी अभियंता शरद वानखेडे, प्रवीण चकोले तसेच भंडारा मंडळातील पथकाला रवाना करतेवेळी अधिक्षक अभियंता राजेश नाईक, कार्यकारी अभियंता नीलेश गायकवाड, स्मिता पारखी यांनी पथकातील सदस्यांना शुभेच्छा दिल्या.





