27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ प्रभारी वैद्यकीय अधिकार्‍यांमुळे कामकाजावर परिणाम

प्रभारी वैद्यकीय अधिकार्‍यांमुळे कामकाजावर परिणाम

0
609

गोरेगाव,दि.19ःग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र ही ग्रामीण आरोग्य जपणारे महत्वाचे माध्यम आहे. ही आरोग्य केंद्र सुसज्ज ठेवण्याची जबाबदारी ही तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाची आहे. मात्र गोरेगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय प्रभावी वैद्यकीय अधिकार्‍याच्या हलगर्जी कारभारामुळे वार्‍यावर आहे. त्यामुळे येथे कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्तीची मागणी होत आहे.
गोरेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातंर्गत कुर्‍हाडी, कवलेवाडा, सोनी, चोपा, तिल्ली व मोहगाव या पाच प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. या आरोग्य केंद्रातंर्गत शेकडो गावातील नागरिकांना वेळेवर व नियमीत आरोग्य सेवा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे सर्वदृष्टीने सुसज्ज ठेवण्याची जबाबदारी ही तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाची आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाला आवश्यक त्या सेवा पुरविते.
मात्र येथील प्रभारी वैद्यकीय अधिकार्‍याच्या हलगर्जी कारभारामुळे तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय वार्‍यावर आहे. परिणामी त्याचा फटका प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवेला व पयार्याने नागरिकांना बसत आहे.
विशेष म्हणजे, प्रभारीपदावर काम करण्याची इच्छा नसल्याने दिसत असल्याने त्याचे अधिनिस्त कर्मचार्‍यांवरही वचक नाही. त्यामुळे कर्मचारीही वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचे दिसून येते. त्यामुळे येथे कायम तालुका वैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी तालुकावासीयांनी केली आहे.