तुमसर,दि.22ःतालुक्यातील बावनथडी नदीतून कार्यान्वित असलेल्या जुन्या गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन जीर्ण झाल्याने फुटली. परिणामी चार दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाल्याने ग्रामवासियांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
बावनथडी येथे बावनथडी नदीच्या तीरावरुन गोबरवाही प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत परिसरातील नाकडोंगरी, राजापूर, चिखला, सितासावंगी, गोबरवाही या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गत ४0 वर्षापासून सुरू आहे. मात्र ४0 वर्षात एखादाही पाईप लाईन बदलविण्यात आली नसल्याने ती पूर्णपणे जीर्ण झाली आहे. त्याचबरोबर सदर पाईपलाईनवरून जड वाहने जात असल्याने ती पाईप लाईन नेहमी क्षतीग्रस्त होऊन लिक होत असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया घालविले जाते.
चार दिवसांपूर्वी नाकडोंगरी येथील रामनगरावरून गेलेली पाईप लाईन फुटली आहे. पाईप लाईन दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. परंतु एका ठिकाणचे काम होताच दुसर्या ठिकाणी पाईपलाईन लिक होण्याचे प्रकार सुरू आहेत. कधी विज पुरवठा खंडित होत असल्याचे कारण पुढे करून चार दिवस गावांना पाणी पुरवठा केला जात नाही.
मागील 4 दिवसापासून खंडित पाणीपुरवठा व पाण्यासाठी होणारी वणवण व तप्त उन्हामध्ये पाण्यासाठी भटकणार्या वृद्ध नागरिक महिला पुरुष व बालके यांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे ही बाब अजूनही पाणी पुरवठा विभागाच्या लक्षात येत नाही असे दिसून येते.




